मराठवाडा मित्र मंडळाच्या भौतिक उपचारशास्त्र महाविद्यालयात विविध उपक्रम
संदेश येवले, प्रतिनिधी
लोहगाव : येथील मराठवाडा मित्र मंडळाच्या भौतिक उपचारशास्त्र महाविद्यालया तर्फे राष्ट्रीय वेलनेस महिन्याच्या निमित्ताने विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येत असून, त्याद्वारे नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, आरोग्यविषयक जागरूकता आणि निरोगी जीवनशैली बाबत जनजागृती केली जात आहे.
महाविद्यालयाच्या बाह्यरुग्ण विभागामार्फत (OPD) नागरिकांना योग्य व्यायाम, शरीराची ठेवण (पोस्चर), स्नायूंची ताकद, लवचिकता, संतुलन तसेच दैनंदिन जीवनात शरीराचा योग्य वापर याबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. पाठदुखी, मानदुखी, सांधेदुखी, स्नायूंच्या समस्या तसेच हालचालींशी संबंधित त्रास टाळण्यासाठी योग्य व्यायाम आणि शारीरिक हालचालींचे महत्त्वही नागरिकांना समजावून सांगितले जाते.
याशिवाय आरोग्य तपासणी शिबिरे, व्यायाम मार्गदर्शन, फिटनेसविषयक जनजागृती, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष फिटनेस उपक्रम तसेच पडणे टाळण्यासाठी (फॉल प्रिव्हेन्शन) आवश्यक व्यायाम व काळजी याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी नियमित हालचाल, संतुलनाचे व्यायाम आणि स्नायूंची ताकद वाढविणारे व्यायाम केल्यास दैनंदिन जीवनातील स्वावलंबन टिकविण्यास मदत होते, याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि तज्ज्ञ यांच्या सहभागातून समाजाभिमुख विविध उपक्रम राबवून फिजिओथेरपीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजार किंवा दुखापत झाल्यानंतर उपचारघेण्याबरोबरच आजार होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
“उपचारापेक्षा प्रतिबंध श्रेष्ठ” आणि “हालचाल हीच आरोग्याची गुरुकिल्ली” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी महाविद्यालयाचे उपक्रम महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे प्रा. डॉ. आशीर्वाद महाजन यांनी सांगितले. नागरिकांनी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत नियमित व्यायाम, योग्य पोस्चर आणि शारीरिक हालचालींचा समावेश करून आरोग्यपूर्ण जीवनशैलीचा अंगीकार करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
