महत्त्वाच्या बातम्या

भाजीपाला देण्याच्या कारणावरून मुख्याध्यापकांना शाळेत घुसून मारहाण; ग्रामस्थांचा संताप

सातारा : पोषण आहारासाठी भाजीपाला देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिंपोळी बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक ब्रह्मदेव वाघमोडे यांच्यावर शाळेच्या कार्यालयात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. मुख्याध्यापकांना शिवीगाळ करून दमदाटी करण्यात आल्याने पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      मिळालेल्या माहितीनुसार, शालेय पोषण आहारासाठी भाजीपाला देण्याच्या मुद्द्यावरून संबंधित व्यक्ती आणि मुख्याध्यापक यांच्यात वाद झाला. या वादातून संबंधित व्यक्तीने थेट शाळेच्या कार्यालयात प्रवेश करून मुख्याध्यापक ब्रह्मदेव वाघमोडे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यासोबत मारहाण करत दमदाटी केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर संबंधित व्यक्ती तेथून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

       शाळेच्या परिसरात मुख्याध्यापकांवर झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली. घटनेच्या निषेधार्थ पालक आणि ग्रामस्थांनी एकत्र येत शाळा बंद ठेवून आपला तीव्र विरोध नोंदवला. शैक्षणिक संस्थेत अशा प्रकारे घुसून शिक्षकावर हल्ला होणे ही गंभीर बाब असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

      दरम्यान, या प्रकरणी वाठार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संबंधित आरोपीला तातडीने अटक करून त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी पोलिसांकडे केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने पोलिसांना निवेदनही देण्यात आले आहे.

      शाळा ही विद्यार्थ्यांच्या सुरक्षित आणि शैक्षणिक विकासासाठीची जागा असून, तेथे शिक्षकांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे या घटनेतील आरोपीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, यासाठी ठोस पावले उचलण्याची मागणी पालक आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!