महत्त्वाच्या बातम्या

व्यासपीठ शुद्धीकरण प्रकरणावरून राहुल गांधींचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल

नवी दिल्ली: उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या जाहीर सभेनंतर व्यासपीठाचे कथित ‘शुद्धीकरण‘ करण्यात आल्याच्या अत्यंत संतापजनक प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (आरएसएस) तीव्र शब्दांत निशाणा साधला आहे. शनिवारी आयोजित एका विशेष पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी या घटनेचा कठोर निषेध करत, हा भारतीय संविधाना नुसार आणि कायद्या नुसार एक गंभीर गुन्हा असल्याचे स्पष्ट केले. देशात दलितांना मिळणाऱ्या आदरावर आणि यशावर पद्धतशीरपणे हल्ले केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.

       पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी देशभरातील अशा प्रकारच्या घटनांचा पाढा वाचला. एखादा दलित व्यक्ती जितका अधिक यशस्वी होतो, तितक्याच तीव्रतेने त्याच्यावर किंवा त्याच्या अस्तित्वावर हल्ले केले जातात, असे सांगत त्यांनी भाजप आणि आरएसएसच्या विचारसरणीवर ताशेरे ओढले. राजस्थानमध्ये काँग्रेसचे सीएलपी नेते टीकाराम जुली मंदिरात गेल्यानंतर तिथले ‘शुद्धीकरण’ केले जाते, बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी मंदिरात गेल्यानंतरही असाच प्रकार घडतो आणि आता मल्लिकार्जुन खरगे यांनी हल्द्वानीच्या रामलीला मैदानावर भाषण दिल्यानंतर व्यासपीठाचे शुद्धीकरण केले जाते, हे सर्व प्रकार अत्यंत क्लेशदायक असल्याचे त्यांनी नमूद केले. दलितांना मान-सन्मान मिळू नये किंवा त्यांना स्पर्श करू नये, अशी संकुचित मानसिकता यामागे असल्याचा दावा त्यांनी केला.

      १० ऑगस्ट रोजी हल्द्वानीमध्ये घडलेल्या या घटने नंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेतही हा मुद्दा लावून धरला होता. मात्र, इतकी गंभीर घटना घडल्यानंतरही उत्तराखंड भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्र भट्ट यांनी या शुद्धीकरणाच्या कृतीचे उघडपणे समर्थन केल्याचे राहुल गांधी यांनी निदर्शनास आणले. हा सर्व प्रकार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत स्पष्टपणे गुन्हा ठरत असतानाही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही, याबद्दल त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

     हल्द्वानी शुद्धीकरण प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व संबंधितांवर तातडीने एफआयआर दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. तसेच, या संपूर्ण प्रकरणावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मौन सोडावे आणि यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही राहुल गांधी यांनी दिले आहे. या प्रकरणा मुळे राष्ट्रीय स्तरावर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!