महत्त्वाच्या बातम्या

चाकण मधील कोंडी आणि खड्ड्यांवर प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; ३१ ऑगस्ट नंतर कामांना वेग

पुणे: औद्योगिक वसाहत म्हणून जगभर ओळखल्या जाणाऱ्या चाकण परिसरातील दिवसेंदिवस बिकट होत चाललेली तीव्र वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, वाढती अतिक्रमणे, अनधिकृत पार्किंग आणि ड्रेनेजच्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आता अत्यंत आक्रमक आणि ठोस पावले उचलली आहेत. चाकणमधील ढासळलेल्या पायाभूत सुविधांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एका उच्चस्तरीय समितीची विशेष बैठक पार पडली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत, वाहतुकीला अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे तातडीने हटवून त्या जागेवर पुन्हा अतिक्रमण होऊ नये म्हणून तातडीने रस्ता, ड्रेनेज किंवा आवश्यक पायाभूत सुविधांची कामे हाती घेण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

        चाकण परिसरातील सुरळीत वाहतूक आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोजित या बैठकीला आमदार बाबाजी काळे, पिंपरी-चिंचवडचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांच्यासह पीएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत घेतलेल्या निर्णया नुसार, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, रस्त्यांच्या साईड पट्ट्या दुरुस्त करणे तसेच साचलेला गाळ व कचरा हटवणे ही अत्यंत अत्यावश्यक आणि प्राथमिक कामे ३१ ऑगस्टपर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे सक्त आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यानंतर १ सप्टेंबर पासून पुढील टप्प्यातील विकास कामांना अधिक वेग देता यावा, यासाठी एक स्वतंत्र कृती आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे.

            रस्त्यांची दुरुस्ती व विकासाची कामे सुरू असताना चालू वाहतुकीमुळे कामाचा दर्जा आणि गती दोन्ही बाधित होतात, हे लक्षात घेऊन योग्य पूर् प्लानिंग करण्याचे ठरले आहे. त्यानुसार, आवश्यकते नुसार २४ तास पर्यायी मार्गांनी वाहतूक वळवून रस्ते दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण केली जावीत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. काम पूर्ण झाल्यावर तो रस्ता त्वरित वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा आणि पीएमआरडीए सह सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करून नागरिकांची होणारी नाहक गैरसोय टाळावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच, चाकणमधील अवजड वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न कायम स्वरूपी मार्गी लावण्यासाठी उपलब्ध अधिकृत जागांचा अचूक नकाशा तयार करून तो उद्योजक, वाहनचालक आणि ट्रान्सपोर्ट असोसिएशन पर्यंत पोहोचवला जाणार आहे. वाहतूक विभाग व असोसिएशन सोबत विशेष बैठक घेऊन मालवाहू वाहने, रिक्षा आणि इतर प्रवासी वाहनांच्या हालचालींचा सर्वंकष अभ्यास करून एकात्मिक वाहतूक आराखड्यात त्याचा समावेश केला जाईल.

      केवळ कागदावर अतिक्रमणे हटवून न थांबता, ज्या मोकळ्या जागांवर कारवाई केली जाईल, तिथे पुन्हा अनधिकृत कब्जा होऊ नये याची काटेकोर दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अशा मोकळ्या झालेल्या जागांवर तात्काळ पदपथ, रस्ता रुंदीकरण अथवा ड्रेनेजची कामे सुरू करण्यात यावीत, जेणेकरून कायम स्वरूपी उपाय योजना होईल. तसेच, परिसरातील नैसर्गिक नाले आणि ड्रेनेजमधील सर्व अडथळे एका महिन्याच्या आत दूर करण्याचे निर्देशही संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. चाकण मधील सर्व रस्ते, ड्रेनेज व्यवस्था आणि पार्किंग व्यवस्थेचे सर्वंकष तांत्रिक सर्वेक्षण करण्याचे ठरले असून, भविष्यात वारंवार रस्ते खोदावे लागू नयेत यासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र येऊन संयुक्त नियोजन करावे, असे या बैठकीत निश्चित करण्यात आले आहे. स्थानिकांनी वेळोवेळी मांडलेल्या तक्रारींची गंभीर दखल घेत प्रशासनाने आता कालबद्ध व परिणामकारक कारवाई सुरू केल्यामुळे चाकणच्या विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!