महत्त्वाच्या बातम्या

खेड तहसील कार्यालयात मतदार यादी पुनरीक्षणाचा आढावा; रुबल अगरवाल यांचे निर्देश

रत्नागिरी: निवडणूक आयोगाच्या निर्देशा नुसार सध्या हाती घेण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचा सविस्तर आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी खेड येथील तहसील कार्यालय, पंचायत समिती आणि विविध मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट दिली. या मोहिमे दरम्यान नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये आणि प्रारूप मतदार याद्या सहज व पारदर्शक पणे उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासकीय यंत्रणेने अधिक तत्परतेने काम करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी या पाहणी दौऱ्यात दिले.

        आयुक्त रुबल अगरवाल यांनी खेड तहसील कार्यालयाला भेट देऊन तेथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीची बारकाईने तपासणी केली. नागरिकांच्या सुविधेसाठी आणि मार्गदर्शनासाठी उभारण्यात आलेल्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम २०२६ सहाय्यता कक्षा’च्या कामकाजाची त्यांनी सखोल माहिती घेतली. याशिवाय, शहरातील एल. पी. इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज परिसरातील चार मतदान केंद्रांना प्रत्यक्ष भेट देऊन तेथील प्रारूप मतदार याद्यांच्या उपलब्धतेची खातरजमा केली. नागरिकांना आपली नावे कोणतीही अडचण न येता सहजपणे तपासता यावीत, यासाठी प्रारूप मतदार याद्या कार्यालयाच्या किंवा केंद्राच्या दर्शनी भागातच ठळकपणे लावण्यात याव्यात, अशा सक्त सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

         केवळ प्रशासकीय कार्यालयांनाच नव्हे, तर खेड पंचायत समिती कार्यालयालाही त्यांनी भेट देऊन मतदार यादी प्रसिद्धी प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. या पाहणी दौऱ्या दरम्यान त्यांनी उपस्थित स्थानिक लोक प्रतिनिधींशी संवाद साधून, प्रारूप मतदार यादीत नागरिकांना आपले नाव तपासण्यासाठी आणि या मोहिमेत जनजागृती करण्यासाठी सर्व स्तरांवरून सहकार्य करावे, असे आवाहन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम अत्यंत महत्त्वाची असल्याने प्रशासनाने कोणत्याही स्तरावर त्रुटी किंवा दिरंगाई राहू देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

         या उच्चस्तरीय पाहणी दौऱ्यात प्रशासनातील अनेक वरिष्ठ अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये जिल्हाधिकारी मनुज जिंदल, प्रांताधिकारी वैशाली पाटील, खेडचे तहसीलदार सुधीर सोनवणे आणि दापोलीच्या तहसीलदार अर्चना बोम्बे प्रामुख्याने सहभागी झाले होते. तसेच खेड पंचायत समितीच्या सभापती डॉ. अफिया पालेकर, जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनीही उपस्थित राहून या मोहिमेच्या नियोजना बाबत चर्चा केली. प्रशासकीय यंत्रणा आणि लोक प्रतिनिधींच्या समन्वयामुळे मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला अधिक वेग येईल, असा विश्वास या दौऱ्या दरम्यान व्यक्त करण्यात आला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!