महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात डिजेवरून वाद पेटला; धंगेकरांचा बापटांवर निशाणा

पुणे: पुण्यातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर डिजे आणि डॉल्बीच्या वापराविरोधात आणि समर्थनात वाद पेटला आहे. डिजेच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आणि डिजेला विरोध करणारे विद्यानंद बापट यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. लोकभावनेतून निर्माण झालेल्या सणांवर कोणतीही बंधने नकोत, असे म्हणत धंगेकरांनी डिजेच्या बाजूने आक्रमक भूमिका घेतली आहे, तर दुसरीकडे नागरिकांच्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत बापटांनी डिजेला कडाडून विरोध दर्शवला आहे.

          रवींद्र धंगेकर यांनी विद्यानंद बापट यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.लोकभावनेशी जोडलेल्या सणांवर अशा प्रकारे बंधने आणणे चुकीचे आहे. उद्या बापट हे नवरात्र आणि कुंभमेळ्यासारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांवरही बंदी घालण्याची मागणी करतील, असा संताप धंगेकरांनी व्यक्त केला. याचदरम्यान बापट यांच्या अलंकारिक भाषेवर बोलताना धंगेकरांनी एक मिश्किल टिप्पणी केली. डिजे, लाऊडस्पीकर हे काही देशावर आलेले मोठे संकट नाही, बापट हे अलंकारिक मराठी भाषा बोलतात आणि त्यातून स्वतःला वेगळे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, पण “बापट यांनी जास्त पेरू खाल्लेत, मी खाल्ले नाहीत म्हणून मला अशी भाषा बोलता येत नाही,” असा टोला लगावत त्यांनी बापटांच्या भूमिकेवर उपरोधिक टीका केली.

     दुसरीकडे, विद्यानंद बापट यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करत स्पष्ट केले की, डिजे आणि डॉल्बी ही आपली कोणतीही सांस्कृतिक परंपरा नाही. सणावर बंदी घालण्याचा माझा कधीही हेतू नाही, परंतु प्रत्येक सणाला लोकभावनेची किनार असली तरी त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा त्रास त्यांनी का सहन करावा, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. परंपरेच्या नावाखाली होणाऱ्या कर्णकर्कश आवाजावर त्यांनी चिंता व्यक्त केली. या वादावर प्रत्युत्तर देताना रवींद्र धंगेकरांनी बापटांना थेट आव्हान दिले की, जर त्यांना यासंदर्भात काही क्रांती घडवायचीच असेल तर त्यांनी थेट न्यायालयात जावे. गणेशोत्सवाच्या तोंडावर पुण्यात डिजेच्या मुद्यावरून रंगलेला हा सामना आता आणखी चुरशीचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!