महत्त्वाच्या बातम्या

देऊरच्या विठ्ठल मंदिराची दुरवस्था; पालकमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

सातारा: सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात ‘प्रति पंढरपूर’ म्हणून राज्यभर परिचित असलेल्या देऊर येथील ऐतिहासिक आणि पुरातन दगडी विठ्ठल मंदिराची अवस्था अत्यंत चिंताजनक बनली आहे. बाराव्या शतकातील या प्राचीन वास्तूच्या शिखरातून पावसाचे पाणी थेट गाभाऱ्यात झिरपत असून, मंदिरातील अनेक मुख्य दगडी खांबांना मोठ्या भेगा गेल्या आहेत. यामुळे मंदिराच्या ऐतिहासिक अस्तित्वा समोर मोठा धोका निर्माण झाला असून, या दैवी व वास्तू वारशाचे संवर्धन करण्यासाठी देऊर ग्रामस्थ आणि वारकरी संप्रदायाने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे तातडीने मदतीची आणि भरीव निधीची आर्त मागणी केली आहे.

        देऊर येथील हे विठ्ठल मंदिर बाराव्या शतकातील असून या परिसराला ऐतिहासिक आणि प्रगाढ धार्मिक महत्त्व लाभले आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या पवित्र प्रसंगी या ठिकाणी हजारो भाविकांची मोठी गर्दी होते आणि विठूरायाच्या दर्शनासाठी परिसरातील विविध गावांमधून भाविक मोठ्या श्रद्धेने दाखल होतात. यामुळेच या क्षेत्राला ‘प्रति पंढरपूर’ अशी सार्थ ओळख मिळाली आहे. या ऐतिहासिक ठिकाणी गेल्या ५८ वर्षांपासून नित्यनेमाने अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केला जात असून, दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासात याच ऐतिहासिक मंदिरातून पायी वारीची परंपरा देखील जोपासली जाते. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून ग्रामीण संस्कृतीची अनेक दशकांची भक्ती परंपरा जपणारे प्रमुख केंद्र बनले आहे.

     शेकडो वर्षांचा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या दगडी मंदिराची सद्यस्थिती मात्र अत्यंत दयनीय झाली असून ती ग्रामस्थ व भाविकांसाठी मोठी चिंतेची बाब ठरली आहे. मंदिराच्या शिखराला मोठ्या प्रमाणावर गळती लागली असून पावसाळ्यात बाहेरील पाणी थेट गाभाऱ्यात पाझरते. याशिवाय मंदिरातील मुख्य दगडी खांबांनाही धोकादायक भेगा पडल्या आहेत. भविष्यात या वास्तूच्या संरचनेला आणखी मोठा धोका निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती व संवर्धन कार्य हाती घेणे काळाची गरज बनली आहे.

      मंदिराची ढासळती अवस्था गांभीर्याने घेत देऊर ग्रामस्थांनी राज्य पुरातत्त्व विभागाशी संपर्क साधून लक्ष वेधले होते. त्यानंतर पुरातत्त्व विभागाचे प्रादेशिक संचालक डॉ. वहाने यांनी नुकतीच या मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि दुरुस्ती संदर्भात काही तांत्रिक सूचना केल्या आहेत. हे एक पुरातन दगडी मंदिर असल्यामुळे याचा जीर्णोद्धार करताना मूळ वास्तुरचना आणि ऐतिहासिक स्वरूपाला कोणतीही बाधा न पोहोचवता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

     शिखराची गळती थांबवणे, भेगा पडलेल्या खांबांची दुरुस्ती आणि संपूर्ण वास्तूचे संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक निधीची गरज आहे. ग्रामस्थांच्या मर्यादित आर्थिक कुवती नुसार एवढा खर्च करणे शक्य नसून राज्य शासनाने या ऐतिहासिक वास्तूच्या बचावासाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतः या मंदिराची पाहणी करून जीर्णोद्धारासाठी आवश्यक शासकीय निधी व प्रशासकीय मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी आग्रही मागणी देऊर ग्रामस्थ व भाविकांकडून करण्यात येत आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!