महत्त्वाच्या बातम्या

स्मार्ट मीटरला चकवा देणे महागात; पुण्यात वीजचोरीची १९ प्रकरणे उघड

पुणे: राज्यभर स्मार्ट मीटर बसवण्याची मोहीम प्रशासना कडून राबवली जात असतानाच, या अत्याधुनिक मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचे प्रकार करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. पुणे जिल्ह्यातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उप विभागांतर्गत स्मार्ट मीटरची सील तोडून तसेच ‘सीटी बायपास‘च्या माध्यमातून मीटरची नोंदणी धिम्या गती करून वीजचोरी केल्याची तब्बल १९ गंभीर प्रकरणे महावितरणच्या तपासणीत उघडकीस आली आहेत. याप्रकरणी दोषी ग्राहकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, यापैकी नऊ जणांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांत थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याने वीजचोरी करणाऱ्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

      महावितरणच्या विशेष पथकाने केलेल्या कसून तपासणी दरम्यान या स्मार्ट मीटरमधील हाय-टेक फेरफार उघडकीस आले आहेत. मीटरचे सुरक्षा सील तोडणे, मीटरचे कव्हर उघडून अंतर्गत रचना बदलणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा अत्यंत कमी वापर नोंदविण्याचा प्रयत्न या ग्राहकांकडून केला जात होता. विशेषतः, चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट‘ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणी तर अत्यंत गंभीर स्वरूपाची छेडछाड समोर आली असून, वीजचोरी करण्यासाठी थेट स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करणारे अत्याधुनिक रिमोट उपकरण बसविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या व्यावसायिक ग्राहकावर २ लाख ६६ हजार ८०० रुपयांचा मोठा दंड आकारण्यात आला आहे.

      या धडक कारवाई मोहिमेत दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलीस ठाण्यांतर्गत नऊ ग्राहकांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर एकूण १२ लाख ४१ हजार १४५ रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. यामध्ये सचिन भास्करराव तायडे (१ लाख १८ हजार ३६० रुपये), सुरज संजीवकुमार सूर्यवंशी (१ लाख ५३ हजार ७७० रुपये), दयानंद श्रीमंत रसाळ (१ लाख ४६ हजार ७० रुपये), संदीप लक्ष्मण गवळी (१ लाख ५६ हजार ५९० रुपये), विष्णू सखाराम चोपडे (१ लाख ४० हजार ४१० रुपये), भगवत नारायण इंगळे (१ लाख ४६ हजार ६५० रुपये), आनंद जी. (६८ हजार ८६३ रुपये) आणि ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे (४३ हजार ६२२ रुपये) या ग्राहकांचा समावेश आहे. तसेच, उर्वरित दहा प्रकरणांमध्येही दंडाची वसुली करून तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कायदेशीर प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

     भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील कठोर तरतुदींनुसार मीटर मध्ये कोणतीही छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करणे हा गंभीर व गैरकायदेशीर अपराध आहे. महावितरणने स्पष्ट केले आहे की, अशा प्रकारे यंत्रणेला चकवा देणाऱ्या ग्राहकांवर केवळ आर्थिक दंड आकारून न थांबता त्यांच्यावर थेट पोलीस कारवाई केली जात आहे. स्मार्ट मीटरच्या अत्यंत संवेदनशील आणि सुरक्षित तंत्रज्ञानामुळे छेडछाड करणारे चोवीस तासांच्या आत उजेडात येत असल्याने नागरिकांनी अशा बेकायदेशीर मार्गांचा अवलंब करून स्वतःच्या अडचणी वाढवून घेऊ नयेत, असा कडक इशारा महावितरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!