पुणे जिल्ह्यात काँग्रेस चा 10 जागांवर दावा
शहरातील हडपसर आणि पर्वतीसह जिल्ह्यातील दौंड, जुन्नर आणि खेड या जागांवरही शहर कॉंग्रेसने दावा केला आहे. तशी मागणी सोमवारी निरीक्षकांसमोर केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसला पुणे शहरासह जिल्ह्यात १० जागा हव्या असल्याचे स्पष्ट झाले आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कॉंग्रेसने जोरदार तयारी सुरू केली आहे. बूथ समित्यांचा आढावा घेण्यासाठी प्रदेश कॉंग्रेसकडून आज हैदराबाद येथील आमदार निजामुद्दीन काझी पुण्यात आले होते. त्यांनी दिवसभर बूथ अध्यक्ष, वॉर्ड, प्रभाग अध्यक्षांच्या बैठका घेऊन आढावा घेतला. त्यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने निरिक्षकांची भेट घेऊन ही मागणी केली. पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवाजीनगर, कसबा आणि पुणे कॅंटोन्मेट हे तीन मतदारसंघ कॉंग्रेसच्या वाट्याला येणार आहेत तर जिल्ह्यात भोर आणि पुरंदर या दोन जागा कॉंग्रेसकडे आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात तीन तर पुणे शहरात दोन जागा वाढवून मिळाव्यात, असा आग्रह पदाधिकाऱ्यांनी धरला आहे. पर्वती, हडपसर तसेच खेड, जुन्नर आणि दौंड येथे पक्षाकडे सक्षम उमेदवार आहेत. तसेच या मतदारसंघांमध्ये पक्षाची ताकदही आहे. त्यामुळे या जागा मिळाव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून अधिक जागा कशा मिळतील, यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन काझी यांनी दिल्याचे सांगितले.
