महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा मोडणे महागात पडणार; पुणे पोलिसांचा कडक इशारा

पुणे: आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. उत्सवा दरम्यान ध्वनीप्र दूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर, तसेच सोशल मीडिया वरून जातीय तेढ निर्माण करणारी किंवा चिथावणीखोर वक्तव्ये करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा कडक दम पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी भरला आहे. दहीहंडी उत्सवाप्रमाणेच गणेशोत्सवातही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला असून, या भूमिकेमुळे कायदा मोडणाऱ्या मंडळांचे आणि समाजकंटकांचे धाबे दणाणले आहेत.

         गणेशोत्सवाच्या तयारीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आणि रस्त्यांची पाहणी करण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच स्थानिक आमदार हेमंत रासने यांनी कसबा पेठ परिसरात प्रत्यक्ष पायी पाहणी दौरा केला. या पाहणी दरम्यान रस्त्यांची सद्यस्थिती, खड्डे, संभाव्य वाहतूक कोंडी आणि उत्सवाच्या काळात निर्माण होऊ शकणाऱ्या इतर अडचणींचा सखोल आढावा घेण्यात आला. रस्त्यावर विनापरवाना किंवा बेकायदेशीर अतिक्रमण दिसून येताच संबंधित दुकानदारांना सक्त समज देण्यात आली, तसेच फरासखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांनी स्वतः रस्त्यावर फिरून कायदा व सुव्यवस्थेवर बारकाईने लक्ष ठेवावे, असे स्पष्ट निर्देश आयुक्तांनी दिले. आगामी दोन ते तीन दिवसांत गणेश मंडळांच्या प्रमुख अडचणी आणि रस्त्यांशी संबंधित सर्व समस्या तातडीने मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

       ध्वनी व्यवस्थे बाबत बोलताना पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले की, यापूर्वी २२ ऑगस्ट रोजी पार पडलेल्या सर्वपक्षीय बैठकीत सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाने निर्धारित केलेल्या ध्वनिमर्यादेचे पालन करण्याचे मान्य केले आहे. उत्सवा दरम्यान केवळ ‘४ बेस आणि ४ टॉप’ या मर्यादित ध्वनिव्यवस्थेलाच परवानगी असणार असून, प्लाझ्मा आणि प्रेशर मिडच्या वापरास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, गणेशोत्सवाच्या काळात पुण्याच्या मध्यवर्ती भागात होणारी अवाजवी गर्दी आणि विसर्जन मिरवणुकांचे नियोजन डोळ्यांसमोर ठेवून जड वाहनांच्या प्रवेशावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

        समाज माध्यमांवर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक आक्षेपार्ह, चिथावणीखोर मजकुरावर पुणे पोलिसांच्या सायबर सेलची विशेष नजर राहणार असून, कोणत्याही वक्तव्यामुळे जातीय सलोखा बिघडल्यास किंवा कायद्याचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर तत्काळ कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. यंदाचा गणेशोत्सव अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिक व गणेश मंडळांनी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!