दौंडमध्ये विमा फसवणुकीचा प्रकार उघड, जीवनरेखा हॉस्पिटलच्या डॉक्टरांवर गुन्हा
दौंड: बनावट व संशयास्पद वैद्यकीय अहवाल, खोटे कागदपत्र आणि ओळखपत्रांच्या आधारे विमा कंपनीची लाखांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी दौंड येथील बहुचर्चित ‘जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’च्या डॉक्टरांसह तिघांविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमाधारकाशी संगनमत करून कंपनीचा विश्वासघात केल्याप्रकरणी नोंदवलेल्या या गुन्ह्यामुळे वैद्यकीय व विमा क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी बजाज इन्शुरन्स कंपनीचे शाखा व्यवस्थापक अभिजित शशिकांत मोरे (वय ४३, रा. काळेबोराटेनगर, हडपसर, पुणे) यांनी दौंड पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यानुसार, डॉ. विशाल गोविंद मिसाळ, माधुरी विशाल मिसाळ (रा. जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, दौंड) आणि विमाधारक संकेत राजू होले (रा. गवळीवाडा, दौंड) यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही फसवणुकीची घटना १३ जुलै २०२४ ते १९ जुलै २०२६ या कालावधीत दौंड येथील जीवनरेखा हॉस्पिटलच्या परिसरात घडली.
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहिती नुसार, दौंड येथील जीवनरेखा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. विशाल मिसाळ व माधुरी मिसाळ यांनी विमाधारक संकेत होले याच्याशी आपापसात संगनमत केले. विमा क्लेमची रक्कम बेकायदेशीरपणे लाटण्याच्या उद्देशाने त्यांनी एक गुन्हेगारी कट रचला. या दरम्यान रुग्णाच्या उपचाराचे पूर्णपणे असत्य, बनावट व संशयास्पद वैद्यकीय अहवाल तयार करण्यात आले. तसेच विविध ओळखपत्रांचे शिक्के आणि खोटे दस्तऐवज वापरून ते विमा कंपनीकडे अधिकृत दाव्यासाठी सादर करण्यात आले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे विमा कंपनीची मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
सध्या बजाज विमा कंपनीच्या शाखा व्यवस्थापकांनी एका विशिष्ट विमा क्लेमबाबत तक्रार दिली असून, त्याअनुषंगाने पोलिसांनी तिघाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असण्याची आणि यात आणखी काही बनावट दावे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा पुढील सखोल तपास पोलीस हवालदार अमीर शेख करत असून, बनावट कागदपत्रांच्या आधारे विमा कंपन्यांना चुना लावणारे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
