महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील खडकवासला परिसरात भीषण अपघात; भरधाव टेम्पोच्या धडकेत २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू, चालक फरार

पुणे: पुण्यातील खडकवासला परिसरामध्ये भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अपघातानंतर संतापजनक बाब म्हणजे टेम्पोचालक जखमीला मदत न करता घटनास्थळी न थांबताच वाहनासह पसार झाला. या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अज्ञात टेम्पोचालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून त्याचा कसून शोध घेतला जात आहे.

       मिळालेल्या सविस्तर माहिती नुसार, कलफ शाबीर हुसेन (वय २६, सध्या रा. न्यू कोपरे गाव, एनडीए रस्ता) असे मृत पावलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. हुसेन हे ८ ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून खडकवासला परिसराबाट जात असताना, डीआयटी (DIT) संस्थेच्या प्रवेशद्वारा समोर मागून आलेल्या एका भरधाव टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की हुसेन रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाले. मात्र, अपघातानंतर मानवी संवेदनांना विसरत टेम्पोचालकाने घटनास्थळी न थांबता आपले वाहन वेगाने पळवून नेले. गंभीर जखमी झालेल्या कलफ शाबीर हुसेन यांना रुग्णालयात हलवण्यापूर्वी किंवा उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

      या अपघाता प्रकरणी मृत तरुण हुसेन यांचे पुतण्या मोहम्मद गोली साह (वय १९, सध्या रा. तळेगाव दाभाडेमूळ रा. रन्नुडी लालपूर, जि. बलरामपूर, उत्तर प्रदेश) यांनी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी पसार झालेल्या टेम्पोचालका विरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर गुन्ह्याचा पुढील सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कसबे करीत असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे फरारी टेम्पोचालकाचा माग काढण्याचे काम सुरू आहे. या दुर्घटनेमुळे मृताच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, शहरात वाढत्या रस्ते अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!