महत्त्वाच्या बातम्या

शिवसेनेत अंतर्गत वाद पेटला; सामंतांनी दिली शेवटची संधी, नवी टीम उभारण्याचे संकेत

धुळे: शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील अंतर्गत गटबाजी आणि हेवेदावे आता चव्हाट्यावर आले असून, यावरून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीव्र शब्दांत आपला संताप व्यक्त केला आहे. धुळे येथे आयोजित एका बैठकीत बोलताना त्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांचे जाहीरपणे कान टोचले. मित्रपक्ष काय करत आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या पक्षात नेमके काय चालले आहे, या आत्मचिंतनाची गरज असल्याचे सांगत सामंत यांनी पदाधिकाऱ्यांना ही अखेरची संधी असल्याचे स्पष्ट शब्दांत सुनावात कडक इशारा दिला आहे.

      धुळ्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेताना मंत्री उदय सामंत यांनी पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. नंदुरबार मध्ये दोन हजार पदाधिकारी असताना धुळ्यात मात्र पन्नास कार्यकर्तेही जमावता आले नाहीत, या वस्तुस्थितीवर बोट ठेवत आपण पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांना आणि साहेबांना अंधारात ठेवून फसवणूक करत आहोत का, असा सज्जड सवाल त्यांनी उपस्थित केला. संपूर्ण महाराष्ट्रातून पक्षाच्या विरोधात सर्वाधिक तक्रारी या धुळे जिल्ह्यातूनच प्राप्त होत असल्याचे सांगत, यापुढे गटबाजी खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या या पारंपरिक बालेकिल्ल्यात आज केवळ एकच आमदार शिल्लक राहिला असून, आपल्याच अंतर्गत चढाओढीमुळे आपण इतरांना संधी देत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

        स्थानिक नेत्यांना मार्गदर्शन करताना सामंत यांनी स्पष्ट केले की, कार्यकर्ते आहेत म्हणूनच आपले राजकीय अस्तित्व टिकून आहे, त्यामुळे आपापल्या राजकारणासाठी कार्यकर्त्यांना भरडण्याचे प्रकार थांबवले पाहिजेत. जिल्हा नियोजन समितीमध्ये (DPC) शिवसेनेचे किमान चार सदस्य असले पाहिजेत आणि महापालिकेतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विरोधी पक्षनेतेपदही शिवसेनेकडेच असायला हवे, अशी आक्रमक भूमिका त्यांनी मांडली. पक्षातील वाद बाजूला सारून नेते मनोज मोरे आणि सतीश महाले यांनी परस्पर समन्वय साधून संघटितपणे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. एकनाथ शिंदे यांच्यामुळेच सर्वांचे राजकीय अस्तित्व आहे, हे विसरू नका, असे सांगत संपूर्ण हॉल शिवसैनिकांनी भरलेला असेल तरच खरी ताकद दिसून येईल, असे त्यांनी सुनावले. जर यापुढेही कारभारात सुधारणा झाली नाही, तर धुळ्यात नवा प्रयोग करून संपूर्ण नवी टीम उभी करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी पदाधिकाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले.

 

 

 

 untitled-design-52-1737636826

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!