महत्त्वाच्या बातम्या

सुरक्षित मातृत्वासाठी ‘माहेरवाशीण’चा आधार; सुनेत्रा पवारांच्या हस्ते उपक्रमाचा शुभारंभ

पुणे: गर्भवती महिलांना वैद्यकीय उपचारां सोबतच भावनिक आधार, सुरक्षितता आणि माहेरासारखी आपुलकी मिळावी, यासाठी सिम्बायोसिस विद्यापीठ रुग्णालय व संशोधन केंद्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अत्यंत संवेदनशील आणि नाविन्यपूर्ण अशा ‘माहेर वाशीण – मातृत्व सेवेची नवी संकल्पना’ या उपक्रमाचा दिमाखदार शुभारंभ लवळे (मुळशी) येथील सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ कॅम्पसमध्ये करण्यात आला. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख हस्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना त्यांनी सुरक्षित मातृत्व ही केवळ आरोग्य यंत्रणेची जबाबदारी नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.

       मातृत्व हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ असून हा प्रवास तिने भीतीतून नव्हे, तर आत्मविश्वासाने पार पाडला पाहिजे, अशी भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. आपल्या संस्कृतीत ‘माहेर’ या शब्दाचा अर्थच माया, आधार, सुरक्षितता आणि ‘तू एकटी नाहीस’ हा मोठा विश्वास असा होतो. गर्भावस्थेपासून ते प्रसूती नंतरच्या काळापर्यंत महिलेला वैद्यकीय उपचारां सोबतच मानसिक व भावनिक सुरक्षितता, योग्य पोषण, विश्रांती आणि सन्मानाची नितांत गरज असते. याच उदात्त विचारातून ‘माहेरवाशीण’ हा उपक्रम साकारण्यात आला असून, प्रत्येक मातेसाठी रुग्णालय हे खऱ्या अर्थाने ‘मातृगृह’ ठरावे, हा यामागचा मूळ उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

         सिम्बायोसिस महिला वैद्यकीय महाविद्यालय आणि ९०० खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात ही ‘माहेरवाशीण’ सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिक टंचाई किंवा अडचणीमुळे कोणतीही माता सुरक्षित व दर्जेदार मातृत्व सेवेपासून वंचित राहू नये, यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. हा संपूर्ण उपक्रम ‘माहेर अनुभव, माहेर पोषण, माहेर संस्कृती आणि माहेर बाळंतपणोत्तर काळजी’ या चार मजबूत आधारस्तंभांवर उभा आहे. यात प्रसूतीपूर्व व प्रसूतीदरम्यान आश्वासक व आनंदी वातावरण, संवेदनशील परिचर्या, पसंतीच्या व्यक्तीची साथ, पौष्टिक आहार, सांस्कृतिक परंपरांचा आदर, स्तनपान व नवजात बालकाची योग्य काळजी यासह प्रसूतीनंतरच्या मानसिक आरोग्याबाबत विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे. तसेच, आशा कार्यकर्त्यांना विशेष प्रशिक्षण देऊन त्यांना ‘माहेर-दूत’ म्हणून सक्षम करण्याची अभिनव संकल्पनाही या माध्यमातून राबविण्यात येत आहे.

         महिला व बालकांचे आरोग्य हा केवळ उपचाराचा विषय नसून तो कुटुंब, समाज आणि राज्याच्या सर्वांगीण विकासाशी निगडित असल्याचे सांगत त्यांनी बारामतीतील महिला रुग्णालयाच्या यशस्वी कार्याचा दाखला दिला. २०१५ मध्ये सुरू झालेल्या या रुग्णालयाच्या माध्यमातून आजवर ४९ हजार ७७० हून अधिक सुखरूप प्रसूती झाल्या असून तिथे मोफत जेवण, ॲम्बुलन्स आणि संपूर्ण काळजी घेतली जाते, असा अनुभव त्यांनी मांडला. सिम्बायोसिसच्या पथकाने या मॉडेलचा अभ्यास करून ‘माहेरवाशीण’ उपक्रमाला आणखी समृद्ध करावे, अशी सूचना त्यांनी केली. ‘माहेरवाशीण’ या संकल्पनेचे रचनाकार डॉ. राजीव येरवडेकर यांनी रुग्णालयात येणाऱ्या महिलेकडे केवळ ‘रुग्ण’ म्हणून न बघता माहेरी आलेली मुलगी म्हणून सन्मानाने पाहिले जावे, असा मानस व्यक्त केला.

      या उच्चस्तरीय सोहळ्याला आमदार शंकर मांडेकर, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या कुलपती डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरू डॉ. आर. रमण, प्रोव्होस्ट तथा वैद्यकीय शाखाप्रमुख डॉ. राजीव येरवडेकर आणि सिम्बायोसिसचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार यांच्यासह अनेक नामवंत डॉक्टर व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान मातृत्व व बाल आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आरोग्यसेवकांचा तसेच ‘माहेरवाशीण’ उपक्रमाच्या लाभार्थी मातांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, गर्भवती महिलांच्या मार्गदर्शनासाठी तयार करण्यात आलेल्या ‘माहेरवाशीण’ माहिती पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!