महत्त्वाच्या बातम्या

गणेशोत्सवात नियमभंग करणाऱ्यांवर सातारा पोलिसांचा बडगा; दोन मंडळांवर गुन्हे

सातारा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दिलेले नियम आणि आदेश धाब्यावर बसवून मिरवणुका काढणाऱ्या गणेश मंडळांविरुद्ध सातारा तालुका पोलिसांनी अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. आगमन मिरवणुकी दरम्यान ध्वनी मर्यादा (डिसिबेल) आणि आरोग्यास घातक ठरणाऱ्या लेझर बीम संदर्भातील नियमांची पायमल्ली केल्या प्रकरणी पोलिसांनी पाटखळ आणि डबेवाडी येथे केलेल्या धडक कारवाईत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हे दाखल केले आहेत. उत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांच्या या भूमिकेमुळे नियमभंग करणाऱ्या आयोजकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

         पहिली कारवाई पाटखळ येथे करण्यात आली असून, येथील ‘श्री संत गाडगे महाराज मित्र गणेशोत्सव मंडळाच्या’ आगमन मिरवणुकीत १३ सप्टेंबरच्या रात्री प्रशासना कडून पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आलेल्या लेझर बीम लाईट्स आणि उच्च क्षमतेच्या डॉल्बी सिस्टीमचा सर्रास वापर करण्यात आला. पोलिसांनी आधीच स्पष्ट सूचना देऊनही नियमांचे जाणीव पूर्वक उल्लंघन झाल्याने मंडळाचे अध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्यासह सिद्धांत, रजत, हणमंत, नवनाथ, गणेश आणि प्रणय सोनटक्के यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याशिवाय, नियमभंग करणाऱ्या या मिरवणुकीसाठी लेझर पुरवणारे मालक अभिजीत पवार (रा. चिंचणी) आणि बेकायदेशीर डॉल्बी सिस्टीम उपलब्ध करून देणारा मालक रजनीकांत नागे यांच्यावरही कायदेशीर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

       दुसरी कारवाई डबेवाडी येथे १३ सप्टेंबरच्याच रात्री पार पडली. येथे कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता डीजे साऊंड सिस्टीम लावून गणपती बाप्पाची आगमन मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी डबेवाडी येथील मंडळाचे अध्यक्ष मयूर माने यांच्यासह आकाश चव्हाण, सुमित माने, विशाल माने, प्रज्वल माने आणि अनिकेत माने या प्रमुख कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

     गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सर्व गणेश मंडळांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. तसेच सातारा तालुका पोलिसांनी ६ सप्टेंबर रोजीच सर्व मंडळांना या बाबतच्या कायदेशीर नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, प्रशासनाच्या या आदेशांकडे आणि आवाहनाकडे दुर्लक्ष करत मस्तीत मिरवणुका काढणाऱ्यांवर प्रभारी पोलीस निरीक्षक नीलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली ही थेट व कायदेशीर कारवाई करण्यात आली. आगामी काळात निघणाऱ्या विसर्जन व अन्य मिरवणुकां मध्ये ज्यांनी कोणी नियम तोडले किंवा प्रशासनाला सहकार्य केले नाही, त्यांच्यावरही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!