महत्त्वाच्या बातम्या

सिंहस्थ कुंभमेळ्यातून नाशिकचे जागतिक ब्रँडिंग; व्यापक आराखडा तयार करण्याचे ब्रिजेश सिंहांचे निर्देश

नाशिक: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी काळात आयोजित होणाऱ्या ऐतिहासिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या माध्यमातून या पवित्र क्षेत्राची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनविषयक ओळख केवळ देशातच नव्हे, तर जागतिक पातळीवर प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी एक सर्वंकष व सर्वसमावेशक माध्यम आराखडा तयार करण्यात यावा, असे स्पष्ट निर्देश माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी दिले आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माध्यम आणि प्रसिद्धी आराखड्याचा आढावा घेण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या सभागृहात आयोजित एका उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. या महत्त्वाच्या बैठकीस प्रशासकीय यंत्रणेतील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        पुढील वर्षी म्हणजेच दर १२ वर्षांनी येणाऱ्या या महाकुंभमेळ्याचे जागतिक स्तरावर योग्य नियोजन आणि प्रभावी ब्रँडिंग करणे काळाची गरज असल्याचे अधोरेखित करत महासंचालक ब्रिजेश सिंह म्हणाले की, पारंपरिक माध्यमां सोबतच डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे (सोशल मीडिया), दृक्-श्राव्य माध्यमे तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध व्यासपीठांचा अत्यंत समन्वयित वापर करण्यात यावा. यासाठी सूक्ष्म नियोजनासह एक व्यापक आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या मोहिमेच्या माध्यमातून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरची प्राचीन धार्मिक परंपरा, ऐतिहासिक वारसा, गोदावरी नदीचे पावित्र्य तसेच प्रमुख तीर्थस्थळांची माहिती देश-विदेशातील भाविक व पर्यटकांपर्यंत अगदी सहजतेने पोहोचावी, यासाठी विशेष मोहीम राबविण्यावर भर दिला जावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

      कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक-त्र्यंबकेश्वरची एक स्वतंत्र आणि आकर्षक पर्यटन ओळख निर्माण करण्याबरोबरच येथील आध्यात्मिक ठिकाणे, स्थानिक लोककला, समृद्ध संस्कृती, पारंपरिक खाद्यपरंपरा, ऐतिहासिक वारसा स्थळे आणि इतर पर्यटनस्थळांचे प्रभावी सादरीकरण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. या विविध माध्यमांसाठी स्वतंत्र आशय निर्मिती (कंटेंट रायटिंग), दर्जेदार साहित्य आणि सोशल मीडिया मोहिमांचे चोख नियोजन करावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, कुंभमेळ्याच्या तयारीदरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरसह संपूर्ण जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध दीर्घकालीन पायाभूत व विकास सुविधांची सविस्तर माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पारदर्शकपणे पोहोचवावी, जेणेकरून नागरिकांना प्रत्येक घडामोडीची अचूक माहिती मिळेल. अफवा किंवा चुकीच्या बातम्यांमुळे गैरसमज पसरू नयेत, यासाठी कोणत्याही अफवेचे तातडीने आणि काटेकोर खंडन करण्याचे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले. या बैठकीत कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी प्राधिकरणाच्या माध्यमातून सध्या सुरू असलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर सादर केली.

       या आढावा बैठकीनंतर महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत थेट रामकुंड परिसराला भेट देऊन तेथील तयारीची प्रत्यक्ष पाहणी केली. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने लाखो भाविकांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या सुविधा, प्रमुख घाट व परिसराचे माध्यमीय सादरीकरण आणि प्रसिद्धीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या इतर तांत्रिक बाबींची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. या बैठकी व पाहणी दौऱ्यादरम्यान पोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, माहिती व जनसंपर्क विभागाचे संचालक डॉ. किशोर गांगुर्डे, प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, नाशिक विभागाचे उपसंचालक डॉ. किरण मोघे, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, महासंचालकांचे विशेष कार्य अधिकारी इर्शाद बागवान, वृत्तचित्र विभागाचे वरिष्ठ सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. प्रशासनाच्या या उच्चस्तरीय नियोजनामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळा अत्यंत दिमाखदार आणि सुव्यवस्थित पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!