महत्त्वाच्या बातम्या

स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत ऐतिहासिक ठेवा उघड; राजगडावर स्वच्छता मोहिमेत सापडल्या शिवकालीन वस्तू

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि पराक्रमाने पावन झालेल्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक किल्ले राजगडावर इतिहासाच्या सुवर्ण काळाची साक्ष देणारा एक अमूल्य ठेवा हाती लागला आहे. तब्बल २५ वर्षांपेक्षा अधिक काळ ज्या राजगडावरून छत्रपती शिवरायांनी राज्याचा राज्यकारभार चालविला, त्याच पावनभूमीवर साडेतीनशे वर्षांनंतरही इतिहासाचे पुरावे देणाऱ्या शिवकालीन ऐतिहासिक वस्तू सापडल्याचा दावा पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आला आहे. दुर्गप्रेमींच्या स्वच्छता मोहिमेदरम्यान लागलेल्या या शोधामुळे शिवसंशोधक आणि इतिहासप्रेमींमध्ये आनंदाचे व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

       पुरातत्व विभागाच्या अधिकृत परवानगीनंतर ‘सह्याद्री प्रतिष्ठान’च्या वतीने किल्ले राजगडावर एक विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती. या मोहिमे अंतर्गत किल्ल्यावरील प्राचीन पाण्याच्या टाक्यांची आणि संजीवनी माचीवरील मातीने अर्धवट गाडलेल्या ऐतिहासिक दरवाज्याची साफसफाई करण्याचे काम सुरू होते. याच स्वच्छता मोहिमेदरम्यान माती हटविण्याचे काम सुरू असताना इतिहासप्रेमींना अनेक महत्त्वपूर्ण आणि दुर्मीळ वस्तू सापडल्या. या वस्तूंच्या यादीमध्ये प्रामुख्याने दोन मोठे तोफगोळे, एक पारंपरिक दगडी जाते, एक तुटलेली जुनी तलवार, आठ ब्रिटिशकालीन नाणी, प्राचीन दगडी अवशेष, जुन्या लाकडी फळ्या आणि अलीकडच्या काळातील एक देवीचा टाक यांसारख्या विविध वस्तूंचा समावेश आहे. राजगडाच्या पोटात दडलेला हा ऐतिहासिक ठेवा बाहेर आल्यानंतर उपस्थितांमध्ये आश्चर्याची लाट पसरली.

       सह्याद्री प्रतिष्ठानचे राज्य सचिव गणेश खुटवड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमे दरम्यान सापडलेल्या या सर्व ऐतिहासिक वस्तू विधिवत आणि सुरक्षितपणे पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अधिक स्पष्टीकरण देताना पुरातत्व विभागाचे सहायक संचालक विलास वाहणे यांनी स्पष्ट केले की, प्रशासनाकडून किल्ल्यावर कोणत्याही प्रकारच्या अनधिकृत किंवा व्यावसायिक उत्खननाची परवानगी देण्यात आलेली नाही. हा सर्व ठेवा केवळ स्वच्छता मोहीम राबवत असताना उजेडात आला आहे.

      छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील लष्करी रणनीती, राज्याचा कारभार आणि त्या काळातील जीवनशैलीची प्रचिती देणाऱ्या या वस्तूंमुळे राजगडाचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि स्वच्छता राखणे किती गरजेचे आहे, याची साक्ष या मोहिमेने दिली असून, या ऐतिहासिक खजिन्यामुळे महाराष्ट्राच्या दुर्गसंवर्धानाच्या इतिहासात आणखी एक मोलाची भर पडली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!