मुंबई लोकल प्रवाशांना मोठा दिलासा; मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष
मुंबई: मुंबई उपनगरीय लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या कोटीहून अधिक प्रवाशांसाठी एक अत्यंत दिलासा दायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल प्रवासा दरम्यान होणाऱ्या अपघातांमध्ये किंवा अचानक प्रकृती बिघडल्यास जखमी व आजारी प्रवाशांना वेळेवर आणि तात्काळ वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागातील तब्बल ४३ रेल्वे स्थानकांवर अत्याधुनिक आपत्कालीन वैद्यकीय कक्ष (Emergency Medical Rooms) सुरू करण्यात येणार असून, सद्यस्थितीत या प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया वेगाने सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही आरोग्य सुविधा लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गांवर प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी आणि प्रवासा दरम्यान घडणाऱ्या अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता, जखमींना तत्काळ वैद्यकीय मदत मिळवून देण्याच्या उद्देशाने मुंबई उच्च न्यायालयाने २००९ मध्येच रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू करण्याचे निर्देश दिले होते. या न्यायिक सूचनेनंतर पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार दरम्यान असलेल्या ३२ स्थानकांपैकी तब्बल २२ स्थानकांवर आधीपासूनच वैद्यकीय कक्ष यशस्वीपणे कार्यरत आहेत. याच धर्तीवर आता मध्य रेल्वेनेही पावले उचलत ४३ नव्या कक्षांच्या माध्यमातून ही अत्यावश्यक आरोग्य सेवा अधिकाधिक स्थानकांपर्यंत पोहोचविण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय विभागात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी १२ आपत्कालीन वैद्यकीय कक्ष आधीपासून कार्यरत आहेत. त्यापैकी कल्याण, भायखळा आणि वाशी या तीन स्थानकांवरील कक्षांची जबाबदारी वैद्यकीय विभागाकडे असून, या तिन्ही कक्षांचे व्यवस्थापन ठाण्याच्या ‘अॅनी फाउंडेशन’ या संस्थेमार्फत पाहिले जात आहे. तसेच कर्जत, कुर्ला, टिटवाळा, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), घाटकोपर, ठाणे, भांडुप, कांजूरमार्ग आणि डोंबिवली या स्थानकांनावरील कक्षांचे व्यवस्थापन रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडे आहे. याशिवाय, चेंबूर आणि मानखुर्द येथील प्रस्तावित वैद्यकीय कक्षांसाठी औषध परवान्याशी संबंधित तांत्रिक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, तर खोपोली येथील कक्षासाठी पावसाळ्यानंतरची बांधकामाची कामे रेल्वे प्रशासनाकडून युद्धपातळीवर हाती घेण्यात आली आहेत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही तीन नवी केंद्रेही प्रवाशांसाठी खुली केली जातील.
मुंबई लोकलच्या प्रवासात सकाळी कार्यालयीन वेळेत आणि संध्याकाळी घरी परतताना होणारी अफाट गर्दी ही नेहमीचीच समस्या आहे. या रोजच्या दगदगीत आणि धावपळीत अनेकदा प्रवाशांना चक्कर येणे, लोकल मधून तोल जाऊन पडणे, गंभीर दुखापत होणे किंवा अचानक प्रकृती बिघडणे यांसारख्या वैद्यकीय समस्या उद्भवतात. अशा संकटसमयी स्थानकावरच प्राथमिक उपचाराची सोय उपलब्ध नसल्यास रुग्णाला पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलवेपर्यंत बराच वेळ निघून जातो, ज्यामुळे अनेकदा जीवघेणी परिस्थिती निर्माण होते. मात्र, आता ४३ नवीन स्थानकांवर हे वैद्यकीय कक्ष सुरू झाल्यास अपघातानंतर किंवा प्रकृती अस्वास्थ्यामुळे तातडीने उपचार सुरू करणे शक्य होणार असून, यामुळे अनेक प्रवाशांचे प्राण वाचण्यास मोठी मदत मिळणार आहे. विशेषतः गर्दीच्या प्रमुख स्थानकांवर या सुविधेचा सर्वाधिक फायदा होणार असल्याने प्रवासी वर्गातून या निर्णयाचे जोरदार स्वागत होत आहे.
