महत्त्वाच्या बातम्या

दिशा सालियन प्रकरणात ‘नेपाळी कनेक्शन’? संजय राऊतांचा गंभीर आरोप, मुख्यमंत्र्यांवरही निशाणा

मुंबई: दिवंगत दिशा सालियन प्रकरणावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा तीव्र राजकीय वादंग निर्माण झाले असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख नेते व खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ठाकरे कुटुंबाला पद्धतशीरपणे आणि राजकीय हेतूने बदनाम करण्यासाठी काही जण एकत्र आले असून, या संपूर्ण प्रकरणामागे ‘नेपाळी कनेक्शन‘ असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच, दिशा सालियनच्या वडिलां कडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंना पाठवल्या जाणाऱ्या अब्रू नुकसानीच्या नोटिसीवरही त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करत ही नौटंकी त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे.

       मीडियाशी संवाद साधताना दिशा सालियन प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत आक्रमक झाले. ज्यांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, त्यांनी आता हा सगळा तमाशा आणि नौटंकी थांबवली पाहिजे, असे सांगत त्यांनी या प्रकरणाची कायदेशीर बाजू स्पष्ट केली. सीबीआयने या प्रकरणाचा सखोल तपास केला असून न्यायालयानेही या प्रकरणात सध्या कोणीही आरोपी नसल्याचे स्पष्ट केले आहे. सीबीआयने या प्रकरणात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असतानाही सातत्याने ठाकरे कुटुंबाला नाहक लक्ष्य केले जात आहे, असे ते म्हणाले.

      या संपूर्ण प्रकरणावर टिप्पणी करताना त्यांनी अत्यंत बोचऱ्या शब्दांत आरोप केला की, काही मंडळी एकत्र येऊन ठाकरे कुटुंबा विरोधात मोठे कटकारस्थान रचत आहेत. या संपूर्ण बदनामीच्या मोहिमेला बाहेरून भरभक्कम आर्थिक पुरवठा होत असून, यामागे ‘नेपाळी कनेक्शन‘ सक्रिय आहे. आर्थिक बळावर ही राजकीय बदनामी केली जात असल्याचा दावा त्यांनी केला, परंतु विरोधकांचे कोणतेही कुटिल मनसुबे यशस्वी होणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

      याच पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नुकत्याच झालेल्या गुजरात दौऱ्यावर आणि त्यांच्या भाषणावरही जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुजरात मध्ये जाऊन मुख्यमंत्र्यांनी गुजरातीत भाषण केल्याच्या मुद्यावर बोलताना राऊत म्हणाले की, अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाचे मूळ व मुख्यालय गुजरातमध्ये आहे. त्यामुळे त्यांना खूश करण्यासाठी मुख्यमंत्री गुजरातीत बोलले असतील, यात नवल वाटण्याचे कारण नाही. मात्र, अमित शाह यांच्या पत्नी महाराष्ट्रातील असल्याने त्यांना उत्तम मराठी येते, आणि खुद्द नरेंद्र मोदी यांनाही शिंद्यांपेक्षा चांगले मराठी बोलता येते. असे असताना मुख्यमंत्र्यांनी गुजरातीत भाषण करणे म्हणजे केवळ पक्षाच्या उच्चाधिकार्यांना खूश करण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

       भाषणाच्या या मुद्द्यावरून मराठी अस्मितेचा धागा पकडत राऊत यांनी शिंदे गटावर गंभीर सवाल उपस्थित केला. मराठी भाषेचा आणि अस्मितेचा विसर पडल्यासारखे वागणे योग्य नाही, असे सांगत त्यांनी वसंतदादा पाटील, शरद पवार, बाळासाहेब ठाकरे आणि यशवंतराव चव्हाण यांसारख्या दिग्गज नेत्यांचे उदाहरण दिले. हे सर्व नेते राष्ट्रीय पातळीवर किंवा दिल्लीत असतानाही नेहमी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगत असत. मात्र, शिंदे गटाचा मूळ ताळेबंदच गुजरातशी जोडलेला असल्यामुळे त्यांना तिकडे जाऊन गुजरातीत बोलावसे वाटले, अशी घणाघाती टीका करत संजय राऊत यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!