राष्ट्रवादीत मोठे संघटनात्मक फेरबदल; डॉ. अंजली साळवे नव्या महिला प्रदेशाध्यक्ष
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (शरदचंद्र पवार) आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे संघटनात्मक फेरबदल करण्यात येत आहेत. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा आता विदर्भाकडे सोपवण्यात आली असून, खानदेश मधून गेल्या तीन वर्षांत महिला विंगचे नेतृत्व यशस्वीपणे सांभाळणाऱ्या रोहिणी खडसे यांचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर, त्यांच्या जागी नागपूर विभागातील आक्रमक व अभ्यासू नेत्या डॉ. अंजली साळवे यांची नवीन महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड निश्चित झाली आहे. लवकरच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. साळवे यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले जाणार असून, पक्षाने घेतलेल्या या निर्णया मुळे विदर्भाला मोठे राजकीय वजन मिळाले आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या तीन वर्षांच्या कार्यकाल काळात महिला प्रश्नांवर सातत्याने आक्रमक भूमिका घेत पक्षसंघटनेला बळकटी दिली होती. आता त्यांचा हा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर नागपूरच्या डॉ. अंजली साळवे यांच्याकडे ही धुरा सोपविण्यात येत आहे. डॉ. साळवे या पक्षाची प्रत्येक भूमिका अत्यंत स्पष्ट, अभ्यासू आणि सडेतोड शब्दांत मांडणाऱ्या नेत्या म्हणून परिचित आहेत. यापूर्वी राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला होता. महिलांच्या हक्कासाठी, सुरक्षेसाठी आणि कायदेशीर तरतुदींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या साळवे यांच्या नियुक्तीमुळे आगामी काळात पक्षाची महिला आघाडी अधिक आक्रमक होईल, यात शंका नाही. दरम्यान, रोहिणी खडसे यांना पक्षामध्ये आगामी काळात कोणती नवी व महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार, याविषयी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
याचबरोबर पक्षाच्या संघटन बांधणीला अधिक वेग देण्यासाठी आणखी एक महत्त्वाची नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योजक तथा पक्षाचे अत्यंत सक्रिय कार्यकर्ते आणि हवेली तालुक्यातील वडाचीवाडीचे माजी सरपंच लक्ष्मण बांदल यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी अधिकृतपणे त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले आहे. बांदल यांच्या नियुक्तीमुळे ग्रामीण भागात पक्षाचे जाळे अधिक मजबूत होण्यास मदत होणार असून, आपण तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्षकार्य अधिक जोमाने पुढे नेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने महिला आणि ग्रामीण नेतृत्वाला प्राधान्य देत जाहीर केलेल्या या नियुक्त्यांमुळे राजकीय वर्तुळात पक्षाच्या आगामी रणनीतीची चर्चा सुरू झाली आहे.
