महत्त्वाच्या बातम्या

पुणे फेस्टिव्हलच्या ३८व्या पर्वाला सुरुवात; उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचा विकासाचा संदेश

पुणे: केवळ भव्य आणि देखण्या इमारती उभ्या राहिल्याने किंवा सिमेंट-काँक्रीटचे जाळे पसरल्याने कोणत्याही शहराचा सर्वांगीण विकास होत नाही, तर शहराच्या भौतिक प्रगती बरोबरच तिथल्या समृद्ध कला, संस्कृती आणि ऐतिहासिक परंपरांचे जतन करणेही तितकेच महत्त्वाचे असते, असे स्पष्ट प्रतिपादन भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. स्वारगेट येथील श्री गणेश कला-क्रीडा रंगमंच येथे आयोजित ३८ व्या ऐतिहासिक ‘पुणे फेस्टिव्हल २०२६’ च्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. देशातील सांस्कृतिक विविधतेला आणि कलाकारांच्या कलागुणांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या या मानाच्या महोत्सवाच्या उद्घाटनाने पुणेकरांच्या सांस्कृतिक उत्साहाला उधाण आले आहे.

        या दिमाखदार सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री तथा पुणे फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, महोत्सवाच्या संरक्षक तथा प्रसिद्ध अभिनेत्री-नृत्यांगना खासदार हेमा मालिनी, खासदार मेधा कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्यासह पुणे फेस्टिव्हलच्या अध्यक्षा मीरा कलमाडी, अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, डॉ. सतीश देसाई आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या उद्घात्तनपर भाषणात उपराष्ट्रपतींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक कार्याचा विशेष गौरव केला. गणेश हा आपला प्रथम पूजनीय देव असून, लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजात क्रांतीची मोठी चळवळ उभी केली, अशी आठवण त्यांनी करून दिली. तसेच पुणे हे विद्येचे माहेरघर असून येथील विविधतेतील ऐक्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

            याप्रसंगी बोलताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी पुण्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वैभवाचा गौरव करत, आगामी वर्षात या मंचावर आपले भाषण अस्खलित मराठीतून करण्याचा मानस व्यक्त केला. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी, महोत्सवाचे संस्थापक स्वर्गीय सुरेश कलमाडी यांनी ३८ वर्षांपूर्वी रोवलेले सांस्कृतिक रोपटे आज एका भव्य वटवृक्षात रूपांतरित झाल्याचे भावनिक उद्गार काढले. स्वर्गीय अजितदादांसोबतच्या मागील आठवणींना उजाळा देत त्यांनी पुणे फेस्टिव्हलला शासना कडून सर्वतोपरी आर्थिक आणि सहकार्य मिळवून देण्यासाठी मंत्रिमंडळात सातत्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्राच्या संतपरंपरा आणि बहुसांस्कृतिक वारशाचा गौरव करत परंपरेचे जतन करताना आधुनिकतेची कास धरण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

       यंदाचा पुणे फेस्टिव्हल संस्थापक अध्यक्ष स्व. सुरेश कलमाडी यांच्या स्मृतीस समर्पित करण्यात आला असून, त्यांच्या कार्यावर आधारित चित्रफितीने उपस्थितांचे लक्ष वेधले. महोत्सवात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दिग्गजांचा सन्मान करण्यात आला, ज्यामध्ये यंदापासून सुरू करण्यात आलेल्या पहिल्यावहिल्या ‘संस्थापक सुरेश कलमाडी पुणे फेस्टिव्हल जीवनगौरव पुरस्काराने’ ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सन्मानित करण्यात आले. याशिवाय ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण शांताराम, नाट्यलेखक-दिग्दर्शक अतुल पेठे, भारतीय महिला हॉकी संघटनेच्या माजी अध्यक्षा अर्णवाज दमानिया आणि फ्लाइंग ऑफिसर निधी सुधीर अगरवाल यांनाही पुणे फेस्टिव्हल विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाची शताब्दी साजरी करणारी ऐतिहासिक रणमर्द शिवाजी मंडळ आणि श्री हनुमान मंडळ प्रतिष्ठानचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला.

        पारंपारिक सनई वादनाने दिमाखात सुरू झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळाली. ज्येष्ठ नृत्यगुरू शर्वरी जेमिनीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेली गणेशवंदना आणि सिम्बायोसिस विद्यापीठातील तब्बल वीस देशांतील परदेशी विद्यार्थ्यांसह भारतीय विद्यार्थ्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेवर सादर केलेल्या विविध सांस्कृतिक नृत्यांनी उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः ‘चक दे इंडिया’ आणि ‘झनक झनक पायल बाजे’ या गीतांवरील सामूहिक सादरीकरणाने रंगमंचावर वेगळाच उत्साह निर्माण केला. सूत्रसंचालन राहुल सोलापूरकर आणि समीरा गुजर यांनी केले. महोत्सवा दरम्यान ‘अंधमुक्त पुणे’ चळवळीअंतर्गत नेत्रदानाविषयी जनजागृती करण्यासाठी आणि फॉर्म भरण्यासाठी विशेष कक्ष उभारण्यात आला असून, पुणेकरांच्या मोठ्या उपस्थितीत हा सांस्कृतिक सोहळा उत्साहात सुरू झाला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!