महत्त्वाच्या बातम्या

राज्यात मान्सूनच्या परतीची चाहूल; मराठवाडा, कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज

पुणे: गेल्या काही दिवसांपासून पावसाने लांबवलेली दडी आणि बहुतांश भागांत कायम असलेला कडक उन्हाचा चटका यामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच, हवामान विभागाने आता राज्यातील वातावरणा बाबत एक महत्त्वाचे अपडेट दिले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी वीज चमकत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामाणातील या अचानक बदलामुळे प्रशासनाने आणि नागरिकांनी योग्य ती सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

       सध्याच्या हवामानाची स्थिती पाहता, उत्तर तमिळनाडू परिसरावर समुद्र सपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. याशिवाय मराठवाड्या पासून ते कर्नाटक आणि आग्नेय अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा विस्तारला आहे. मान्सूनचा मुख्य आस असलेला कमी दाबाचा पट्टा देखील सध्या विस्कळीत झाला असून, पश्चिम राजस्थानातून मान्सूनच्या माघारीस अधिकृत सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून माघारी फिरताच राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळ पर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३७.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर त्यापाठोपाठ जेऊर, अमरावती, परभणी, अकोला आणि वर्धा येथे ३६ अंशांपेक्षा अधिक आणि चंद्रपूरमध्ये ३५ अंशांपेक्षा जास्त तापमानाची नोंद झाली. याउलट, महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, मराठवाड्यातील परभणीच्या सोनपेठ येथे सर्वाधिक ११० तर बीडच्या परळी वैजनाथ येथे १०० मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे.

       राज्यात यंदाच्या हंगामात पावसाची तूट मोठी चिंताजनक ठरली आहे. १ जून ते ६ सप्टेंबर २०२६ या कालावधीत महाराष्ट्रात सरासरीच्या तुलनेत केवळ ८३.५ टक्के पाऊस झाला असून, संपूर्ण राज्यात तब्बल १६.५ टक्के पाऊस कमी झाला आहे. दीर्घकाळ पडलेल्या खंडांमुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील खरीप पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः बीड जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत केवळ ६८.५ टक्के पाऊस झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. पावसाने दिलेल्या या दीर्घ खंडामुळे आगामी काळात गंभीर पाणीटंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. पिण्याच्या पाण्याचे उपलब्ध स्रोत सुरक्षित ठेवण्यासाठी आणि भूजलाचा अतिवापर टाळण्यासाठी भूजल उपशावर कठोर निर्बंध घालण्याचे निर्देश शासना कडून देण्यात आले असून, या नियमांची अंमलबजावणी पुणे जिल्ह्यासह राज्यभर कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परतीच्या पावसामुळे पिकांना कितपत जीवदान मिळते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटतो, हे आगामी काही दिवसांच्या हवामानावर अवलंबून असणार आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!