महत्त्वाच्या बातम्या

पुणे गणेशोत्सवात एआयची एन्ट्री; एलईडी आणि यांत्रिक हालचालींनी देखावे झाले जिवंत

पुणे: सांस्कृतिक आणि धार्मिक समृद्धीचा वारसा असलेल्या पुणे शहरात दरवर्षी गणेशोत्सवाचे विलोभनीय रूप पाहायला मिळते. यंदाच्या २०२६ च्या गणेशोत्सवात मात्र परंपरेच्या या पायंड्याला आधुनिक तंत्रज्ञानाची अत्यंत प्रभावी जोड मिळाल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या पारंपरिक जिवंत देखाव्यांचे स्वरूप संपूर्णपणे बदलून टाकले असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), हायटेक एलईडी पडदे आणि अत्याधुनिक यांत्रिक यंत्रणांचा वापर करून साकारलेले हे देखावे भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. कलाकारांचा सजीव अभिनय, डिजिटल पार्श्वभूमी आणि अचूक यांत्रिक हालचाली यांचा अनोखा संगम यंदाच्या उत्सवात पाहायला मिळत आहे, ज्यामुळे पुणेकरांना एका नव्याच दृश्यानुभवाचा अनुभव मिळत आहे.

         शहरातील मध्यवर्ती पेठांसह विविध भागांमधील प्रतिष्ठित गणेश मंडळांनी पौराणिक, ऐतिहासिक आणि समकालीन सामाजिक विषयांवर आधारित जिवंत देखावे तयार केले आहेत. यामध्ये ‘कांतारा‘, ‘रावणवध‘, ‘इथे ओशाळला मृत्यू‘, ‘मल्हार-बानू विवाह‘, आणि ‘गड आला पण सिंह गेला‘ यांसारख्या लोकप्रिय विषयांचा समावेश असून, त्यांच्या सादरी करणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. उदाहरणार्थ, सदाशिव पेठेतील टिळक चौक येथील गणेश मित्र मंडळाने भगवान श्रीकृष्ण-सत्यभामा आणि नरकासुर युद्धाचा अत्यंत रोमांचक देखावा साकारला आहे. या देखाव्यातील पुतळ्यांच्या हालचालींसाठी अचूक यांत्रिक यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे, ज्यामुळे युद्धाचे दृश्य अतिशय सजीव वाटते. त्याचप्रमाणे, नेहमीच नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी चर्चेत असणाऱ्या शनिपार मंडळाने यंदा आधुनिक तंत्रज्ञान व प्रोजेक्शनच्या सहाय्याने ‘शंभाला’ हा अनोखा देखावा साकारला आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष समीर गायकवाड यांनी दिली आहे.

        पूर्वी जिवंत देखाव्यांमध्ये प्रत्यक्ष रंगमंचावर साकारता न येणारी महाकाय युद्धदृष्ये, प्राचीन ऐतिहासिक स्थळे किंवा निसर्गरम्य वातावरण निर्मिती करणे कठीण जात होते. मात्र, आजच्या काळात हत्ती गणपती मंडळासह अनेक मंडळांनी देखाव्याच्या मागील बाजूस महाकाय एलईडी पडदे लावून त्यावर एआयच्या मदतीने तयार केलेल्या चित्रफिती प्रदर्शित करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रत्यक्ष अभिनेत्यांचा अभिनय आणि पडद्यावरील डिजिटल पार्श्वभूमी यांचा सुरेख मेळ साधला जात आहे. विशेष म्हणजे, पुतळे किंवा मूर्ती वर-खाली करण्यासाठी किंवा त्यांच्या विविध हालचाली घडवून आणण्यासाठी वजन व गरजेनुसार हायड्रॉलिक यंत्रणा किंवा इलेक्ट्रिक स्क्रू जॅकचा प्रभावी वापर केला जात आहे. हायड्रॉलिक प्रणालीमध्ये तेलाच्या दाबाने जॅक कार्यरत होऊन पुतळ्यांची हालचाल अत्यंत हळुवारपणे आणि नैसर्गिक वाटते, तर लहान देखाव्यांमध्ये मोटारच्या सहाय्याने फिरणाऱ्या स्क्रू जॅकचा वापर करून आकर्षक परिणाम साधले जात आहेत.

           तंत्रज्ञानाचा हा बदल केवळ मोठ्या मंडळांपुरता मर्यादित न राहता आता डिजिटल माध्यमांपर्यंत पोहोचला आहे. मोबाईल मधील विविध एआय अनुप्रयोगांच्या (Apps) मदतीने मंडळातील तरुण कार्यकर्ते स्वतःच देखाव्यासाठी लागणारी डिजिटल पार्श्वदृश्ये आणि चित्रफिती तयार करत आहेत. दोन प्रसंगां मधील दुवा साधणे किंवा एखादा मोठा प्रसंग काही क्षणांत प्रभावीपणे मांडण्यासाठी या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होत आहे. याशिवाय, प्रत्येक मंडळाने सोशल मीडियासाठी स्वतंत्र विशेष पथके तयार केली असून याद्वारे बाप्पाची आरती, जिवंत देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे छायाचित्रे व रील्स जगभरातील भाविकांपर्यंत पोहोचवले जात आहेत. पारंपारिक जिवंत देखाव्यांच्या या आधुनिक प्रवासाने गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवात एक नवी आणि डिजिटल भर घातली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!