अल्पवयीन विद्यार्थिनीची माणगंगा नदीत उडी घेऊन आत्महत्या
दहिवडी(ता. माण) येथील एका विद्यालयात शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थीनीने माणगंगा नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली. विदयार्थीनी नेहमीप्रमाणे शाळेत आली होती. परंतु दप्तर शाळेमध्ये ठेऊन ती कुठेतरी गेली असल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आले. शिक्षकांनी तिच्या आईला फोन करून सांगितले. आईने अनेक ठिकाणी शोध घेतला. जवळच्या नातेवाईकांना फोन वरून विचारणा केली. परंतु कुठेच तपास न लागल्याने आई शाळेजवळ येऊन थांबली मुलगी दप्तर घेण्यासाठी येणार म्हणून आई तिथेच थांबून राहिली. तेवढ्यात ४ वाजण्याच्या सुमारास मुलगी शाळेजवळ आली.आईला पाहताच ती मारण्याच्या भीतीने पळू लागली.आई हातात काठी घेऊन तिच्या मागे लागली. आई जास्त मारेल या भीतीने ती माणगंगा नदीच्या दिशेने पळत सुटली.
मार खाण्याच्या भीतीने तिने नदीच्या पुलावरून उडी मारली. आईने आरडा ओरडा करून नागरिकांना जमविले. परंतु शोध घेण्यास उशीर लागला अखेर मुलीला पाण्यातून बाहेर काढले.तिला पुढील उपचारांसाठी दहिवडी येथील ग्रामीण शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून सहाय्य्क पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पोलिस हवालदार बापु खांडेकर करत आहेत.
