महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगेंवर अजय महाराज बारस्करांचा घणाघात; ‘टेंडरयोद्धा’ म्हणत वाळूचोरीसह गंभीर आरोप

अहिल्यानगर: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अजय महाराज बारस्कर यांनी अत्यंत गंभीर आणि स्फोटक आरोप केल्यामुळे राज्यभरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मनोज जरांगे हे संघर्षयोद्धा नसून ते ‘टेंडरयोद्धा‘ असल्याचा घणाघाती आरोप करत बारस्करांनी त्यांच्यावर अवैध वाळू उत्खनन, आर्थिक गैरव्यवहार आणि आंदोलनाच्या नावाखाली संपत्ती जमवल्याचे गंभीर दावे केले आहेत. यापूर्वीही दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा वाक्दयुद्ध पाहायला मिळाले होते, परंतु आता थेट वाळूचोरी आणि आर्थिक व्यवहारांचे तपशील समोर आणल्यामुळे या वादाला नवी आणि तीव्र किनार प्राप्त झाली आहे.

            अजय महाराज बारस्कर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आरोप केला की, मनोज जरांगे यांच्या जवळचे सहकारी संजय नानासाहेब कटारे आणि त्यांचे मेहुणे विलास खेडकर यांच्यासह काही व्यक्तींचा अवैध वाळू उत्खनन प्रकरणाशी थेट संबंध आहे. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव आणि डोमलगाव परिसरातील गोदावरी नदीपात्रातून सुमारे दोन हजार ब्रास अवैध वाळू उत्खनन केल्याप्रकरणी प्रशासकीय पातळीवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी या प्रकरणातील दंडाच्या कारवाईत सवलत दिली होती, मात्र आता तो आदेश रद्द करण्यात आला असून सुमारे चार कोटी नव्वद लाखाहून अधिक रुपयांचा दंड पुन्हा कायम करण्यात आला आहे, असा दावा बारस्कर यांनी केला आहे. प्रशासकीय पातळीवर या कारवाईची कागदपत्रे समोर येत असतानाच या प्रकरणाचे धागेदोरे जरांगे यांच्या निकटवर्तीयां पर्यंत जात असल्याचा दावा करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

            केवळ वाळू उत्खननापुरते मर्यादित न राहता बारस्कर यांनी जरांगे यांच्या कार्यपद्धतीवर आणि आर्थिक व्यवहारांवरही कडक शब्दांत ताशेरे ओढले. आंदोलनाच्या नावाखाली पैसे गोळा करून त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. तसेच, जरांगे यांच्या वापरात असलेल्या वादग्रस्त ‘डिफेंडर‘ वाहनावरूनही त्यांनी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करत हे वाहन नेमके कोणाच्या माध्यमातून आणि कोणत्या निधीतून उपलब्ध झाले, असा सवाल केला. सांगलीतील एक व्यापारी भोसले यांच्या माध्यमातून कथित आर्थिक व्यवहार झाल्याचा आणि काही कंपन्यांवर छापासत्र पडल्यानंतर ती रक्कम ॲम्ब्युलन्सद्वारे जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा अत्यंत खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. आपल्या या सर्व आरोपांच्या संदर्भात आपण सविस्तर तक्रार सक्तवसुली संचालनालयाकडे (ED) आधीच दाखल केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

         दरम्यान, अजय महाराज बारस्कर यांनी केलेल्या या सर्व सनसनाटी आरोपांनंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. यापूर्वी अशा प्रकारच्या प्रत्येक आरोपावर जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली असून सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आगामी राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यावर झालेल्या या टीकेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. या नवीन आरोप-प्रत्यारोपांवर आता मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून काय अधिकृत प्रतिक्रिया दिली जाते आणि या वादाला काय नवीन वळण मिळते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

 

error: Content is protected !!