महत्त्वाच्या बातम्या

कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ,भाषा मंडळ : अपेक्षा आणि आव्हाने

      रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पदभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाने यु.जी.सी.चे उच्चतर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून  प्रक्रिया पूर्ण होत २७ ऑक्टोबर २०२१ रोजी ‘ कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा ची स्थापना झाली. बहुजन समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना ,सर्व स्तरातील विशेषत: उच्च शिक्षण मिळावे व त्यातून स्वावलंबी जबाबदार नागरिक तयार व्हावेत यासाठी  कर्मवीरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. छत्रपती शिवाजी कॉलेज हे/कर्मवीरांनी सुरु केलेले पहिले कॉलेज. यात कला ,विज्ञान व वाणिज्य हे तिन्ही विभाग सुरु झाले. नंतर हळूहळू यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स व धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय ही छत्रपती शिवाजी कॉलेज पासून स्वतंत्र झाली. कर्मवीरांच्या नंतर रयत शिक्षण संस्थेची दोन्ही कॉलेजेस स्वतंत्र झाली तरी त्यांनी गुणवत्तेच्या बाबतीत नेहमीच चांगली कामगिरी केली. परिणामी सतत प्रयोगशील राहून आव्हाने स्वीकारून दमदार कामगिरी करून त्यांनी अ श्रेणी मिळवून स्वायत्त महाविद्यालय म्हणून देखील चांगली कामगिरी केली. रयत शिक्षण संस्था ही कर्मवीरांच्या प्रमाणेच आधुनिक विचाराला महत्व देणारी आहे. जुन्या त्याच त्या गोष्टी करण्यात तिला रस नाही.आव्हाने स्वीकारणे, तयारी करणे, परीक्षेत उतरणे आणि   नाविन्यपूर्ण दृष्टी ठेवून विद्यार्थी, समाज यांच्या हिताच्या गोष्टी करण्याची कळकळ तिच्यात कर्मवीरांच्या अंत:करणातून पाझरलेली आहेच पण एक नैतिक प्रेरणा देखील झालेली आहे. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर कर्मवीरांनी महात्मा गांधी यांच्या नावाने १०० शाखा तयार करण्याचा पण तर केलाच पण एक स्वतंत्र विद्यापीठ असावे असे स्वप्न पाहिले होते.

      पूर्वी मुंबई विद्यापीठ,नंतर पुणे विद्यापीठ यांच्याशी सलग्न असणारे हे छत्रपती शिवाजी कॉलेज शिवाजी विद्यापीठाशी देखील सलग्न होते पण २७ ऑक्टोबर २०२१ रोजी कर्मवीर यांचे स्वतंत्र विद्यापीठाचे स्वप्न पूर्ण झाले. राज्य विद्यापीठ म्हणून  किंमत प्राप्त झाली आहे. भारतात ज्यावेळी बहुजनांना शिक्षणाची गरज होती त्यावेळी  कोणतीही वैयक्तिक सुखे न घेता एक  ध्यास घेऊन रयतचे संस्थापक कर्मवीरभाऊराव पाटील  व त्यांचे अनुयायी यांनी काम केले. संविधान अजून मनातही नव्हते. त्या काळात कर्मवीर यांनी  संविधांनाच्या स्वप्नातील गावे उभी रहावीत यासाठीच जणू चळवळ उभी केली होती. त्यांच्या बोर्डिंगमध्ये समता बंधुतेची शिकवण विद्यार्थी आचरणात आणत होते.  गावागावातून सातारा येथे शिक्षणास आणलेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी ,पुणे ,मुंबई ,राजाराम कॉलेज कोल्हापूर येथे जावे लागतेय. या मुलांना तेथे अडचणी येतात त्यापेक्षा या सर्वांची उच्च शिक्षणाची सोय साताऱ्यातच व्हावी ही इच्छा बाळगून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेज फ्री आणि निवासी तत्वावर सुरु केले होते. कमवा आणि शिका योजना  ही  कॉलेजची योजना आजही त्याच जाणीवेने सुरु आहे. आज एकाच कॉलेजपासून स्वतंत्र झालेली ही कॉलेजेस पुन्हा एकत्र आलीत आणि यांचे मिळून कर्मवीर ‘भाऊराव पाटील विद्यापीठ  सातारा’ हे सुरु झाले आहे. आता सातारामध्ये अनेक कॉलेजेस व विद्यापीठ झालीत. सरकारी मेडिकल विद्यापीठ उभे राहत आहे. इंजिनियरिंग कॉलेजेस उभी राहिली आहेत. काळाच्या मागणीनुसार आणि  देशाच्या उद्दिष्टानुसार काम करून विद्यार्थ्यांना घडवले तर पाहिजेच पण वैश्विक पातळीवर एक कर्तबगार व्यक्तिमत्व उभे करण्याची जबाबदारी या विद्यापीठाची आहे. 
        या विद्यापीठाचे वैशिष्ट्य हे की स्पर्धात्मक गुणवत्ता व  उत्कृष्टता यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे अभिप्रेत आहे. विद्यार्थी हा राष्ट्रवादी व मानवतावादी तयार करायचा आहे. समाजातील एक उत्पादक घटक म्हणून विद्यार्थी तयार करायचा आहे. उद्दिष्टात मराठी भाषा व आदिवासी भाषा यांचे जतन व प्रसार यांची जबाबदारी आपण घेतलेली आहे. विद्यापीठाची अधिकार व कर्तव्य ही सर्व नागरिकांनी व विद्यापीठातील घटकांनी  राज्य शासनाच्या विद्यापीठ स्थापन अधिसूचनेतून वाचली पाहिजेत. आपल्याला कोणत्या रस्त्याने कोणत्या स्टेशनवर कसे पोचले पाहिजे याचा अभ्यास ही आवश्यक गोष्ट आहेच पण कृतिशीलता ही अतीव महत्वाची गोष्ट आहे. जवळपास ५७  उद्दिष्टे आपण कशी पूर्ण करणार यांचे नियोजन व अंमलबजावणी सुरूच आहे.  या पार्श्वभूमीवर  विद्यापीठाचे भाषा मंडळ मराठी  भाषा संस्कृती,आदिवासी बोली भाषा यांचा संशोधन व अभ्यास करण्यासाठी भाषा मंडळ असून या भाषा मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय कुलगुरू डॉ.ज्ञानदेव म्हस्के हे आहेत. भाषा मंडळाचे प्रभारी संचालक म्हणून छत्रपती शिवाजी कोलेजचे मराठी विभाग प्रमुख  प्रा.डॉ.सुभाष वाघमारे हे आहेत .मराठी भाषा किंवा अन्य बोली भाषेत,प्रमाणपत्र ,पदविका व पदवी अभ्यासक्रम सुरु करणे, लिखित स्वरुपात नसलेल्या आदिवासी भाषिक यांची माहिती घेऊन आदिवासी भाषेत अहवाल पूर्ण करून  घेणे,भाषा मंडळाच्या कार्यक्रमात समुदाय,समूह व व्याव सायिक मंडळांना  सहभागी करून घेणे,मराठी बोली भाषा,संस्कृती प्रचार प्रसार साठी वार्षिक अर्थसंकल्प तयार करणे,मान्यता प्राप्त संस्था व विद्यापीठ विभागात कार्यक्रम घेणे,महाविद्यालये व विद्यापीठ यांच्या चालू कार्यात समुदाय सहभागी करून घेण्यासाठी विद्यापीठ स्तरावर स्पर्धा ,शिबिरे भरवणे ,प्रशिक्षण कार्यशाळा व परस्पर देवाण घेवाण करणारे कार्यक्रम आयोजित करणे,उद्दिष्टपूर्तीसाठी विविध कार्यक्रम अंमलबजावणी करणे–इत्यादी उद्दिष्टे भाषा मंडळाची आहेत.

       मराठी भाषा संस्कृती व आदिवासी बोली भाषा जतन संवर्धन या बाबीसाठी कोणते कार्यक्रम असायला हवेत, यासाठी गाव शहरातल्या  सर्व नागरिक, विद्यार्थ्यांनी  महाराष्ट्र राजपत्रात असलेली सर्व माहिती वाचली पाहिजे व विद्यापीठ भाषा मंडळास सूचना लेखी स्वरुपात दिले पाहिजे.भाषा मंडळ मधील निवडक सदस्य यांनीच केवळ मते मांडावीत असे नाही. मला दोन महत्वाच्या गोष्टी यात दिसतात प्रमाणपत्र ,पदविका व पदवीसाठी कोर्स जर चालू  करायचे असतील तर  त्या समाजातील सर्वांनी स्न्हेह संबंध जपून आपल्या सुचना जरूर आम्हाला सांगायला हव्यात. जे वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचे त्यात  साहित्यिक कार्यक्रमात  नवोदित व प्रथितयश यांचेसाठी कवी संमेलन,कथा,निबंध, आणि लघुकथा लेखन स्पर्धांचे आयोजन ,मराठी साहित्य वाचनासाठी पुस्तक मेळावे आणि चर्चासत्रे घेणे या बाबी विचाराधीन आहेत.संस्कृती संवर्धन साठी लोककला महोत्सव, पोवाडा, लावणी, भारूड, दशावतार यांसारख्या लोककला सादरीकरणाचे आयोजन तसेच सणांचे पारंपरिक पद्धतीचे रूप आणि त्यामागील मानवहित या विषयी कार्यक्रम, विविध बोलीभाषा शिकवण्यासाठी कोकणी ,झाडी ,अहिराणी ,मालवणी इत्यादी भाषेच्या कार्यशाळांचे आयोजन,भाषिक कौशल्य प्राप्तीसाठी  मराठी भाषेत लेखन, वक्तृत्व आणि अनुवाद यांसाठी प्रशिक्षण,मराठी भाषा आणि साहित्य यावर  मार्गदर्शन, मराठी भाषेतील ॲप्स : मराठी शब्दकोश, बोलीभाषांचे ध्वनी संग्रह, वाचनासाठी ई-बुक्स उपलब्ध करून देणे.मराठी भाषा दिन  कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम करणे, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी मराठी पुस्तक वाचन स्पर्धा आयोजन  प्रसार माध्यमात  बोलीभाषा, लोककथा, आणि साहित्यावर आधारित  मालिकांची निर्मिती करणे,यु ट्यूब चॅनलची निर्मिती करणे,बोलीभाषेमध्ये विविध बोलीभाषांचे शब्दसंग्रह तयार करून  ध्वनी नोंदी, आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे जतन करणे ,दुर्मीळ मराठी ग्रंथ आणि हस्तलिखिते जतन करणारी केंद्रे स्थापन करणे लोकांना मराठी भाषेतून तसेच बोलीभाषेतून  बोलण्यास प्रोत्साहन देणारे कार्यक्रम आयोजित करणे, ग्रामीण भागातील मराठी बोलीभाषा जपण्यासाठी विशेष कार्यक्रम करणे मराठी संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या लेखकांचा पुरस्कार देऊन गौरव करणे ,मराठी विषयात विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करणे, समाजमाध्यमात मराठी भाषा, साहित्य आणि बोलींना प्रोत्साहन देणारे उपक्रम सुरु करणे मराठीतील लघुपट, पोस्टर, आणि कविता सादरीकरण  आयोजन करणे 
      आदिवासी भाषांचा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी पदविका कोर्स सुरु करता येईल. मराठीच्या अभ्यासक्रमात अनेक पेपरचे अभ्यासक्रम जतन संवर्धनसाठी उपयुक्त आहेत. पण प्रश्न असा आहे की आधुनिक जगात उदर निर्वाहासाठी रोजगार मिळवताना असे अभ्यासक्रम उपयुक्त ठरत नाहीत त्यामुळे नोकरी किंवा रोजगार मिळण्याची शास्वती नसल्याने प्राचीन भाषा,बोली,यात ज्ञान असूनही विद्यार्थया क्षेत्रात येण्याचा विचार नाहीत.  अगदी मराठी भाषा पदवीसाठी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कृती आणि भाषा यांचा कितीही आदर असला तरी मिळविलेले ज्ञान कसे उपयोगी होणार  आणि उत्पादक म्हणून असा अभ्यास केला तरी ते कसे विकायचे ,किंवा जतन करून पुढे  काय करायचे या मार्गदर्शनाची गरज जास्त वाटत आहे. आदिवासी भाषांचे व्याकरण, शब्दसंग्रह, आणि बोलीभाषांचा अभ्यास आदिवासी समूहांच्या सांस्कृतिक परंपरांचा अभ्यास,आदिवासी भाषांचे जतन व संवर्धनासाठी तंत्र व धोरणे,आदिवासी समाज आणि साहित्याचा अभ्यास या प्रकारचे असे विषय संशोधनात आणता येईल .पीएचडी पदवीसाठी हे विषय महत्वाचे असतील. भाषांतर आणि अनुवाद करण्याचे कौशल्य कमावण्यासाठी विद्यार्थ्यांना व प्राध्यापक यांना देखील स्वतःच्या क्षमता विकसित कराव्या लागतील. आंतरराष्ट्रीय पातळीवर उतरण्यासाठी  अधिकाधिक भाषांचे संपादन आवश्यक ठरेल. बोलीवर आधारित शिक्षण साहित्य तयार करता येतील आदिवासी भागांमध्ये भाषिक कौशल्यांमुळे पर्यटन क्षेत्रात संधी  मिळू शकेल .स्थानिक बोलींवर आधारित पर्यटन मार्गदर्शक पुस्तिका तयार  करता येईल. कला व विविध प्रसार माध्यमात बोलीभाषांवर आधारित  आदिवासी कथा, गाणी, आणि परंपरा लिहून साहित्यिक क्षेत्रात योगदान देता येईल. डिजिटल सामग्री तयार करता येईल. आदिवासी  भाषा  प्रकल्पांमध्ये रोजगार मिळू शकेल. भाषिक धोरणे तयार करण्यासाठी सल्लागार म्हणून काम मिळू शकेल.स्थानिक इतिहास आणि भाषा जतनासाठी संग्रहालये आणि सांस्कृतिक केंद्रांत काम मिळू शकेल अशा अपेक्षा जरी असल्या तरी ज्या विद्यार्थ्याकडे कौशल्य आणि क्षमता  या प्रभावी असायला हव्यात हे अभिप्रेत असेल. आज विद्यार्थ्यांचा ओढा  जागतिक भाषा शिकून परदेशी जाण्यासाठी दिसतो  आहे. विद्यार्थ्यांच्यात देखील आर्थिक विषमतेचे स्तर आहेत. शिक्षण घेताना सर्व विद्यार्थ्यांचा मनोभाव चांगला असावाच लागेल तसेच  आर्थिक सहाय आणि योग्य दिशा नसेल तर विद्यार्थ्यांचे नुकसान होईल. म्हणूनच भाषा विभागांनी सतत चिंतन करायला हवे. प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले   पर्यावरण देण्याचे आणि त्यांच्या क्षमतांचा विकास करून घेण्याची जबाबदारी प्राध्यापक पालक यांची आहे. अलीकडे बहुजन समाजातील ग्रामीण परिसरातील विद्यार्थ्यांना पोटापाण्याचे प्रश्न जास्त आहेत. त्यामुळे रोजगारासाठी कधी शिक्षण सोडून विद्यार्थी कॉलेज सोडून जातात. या सर्वाना न्याय मिळायचा असेल तर शिक्षणात  तंत्रज्ञान आणले पाहिजे. ज्या विद्यार्थ्याला संगणकावर अजून काम करता येत नाही असे बरेच विद्यार्थी असतील. म्हणून  कॉलेजमध्ये  अद्ययावत तंत्रज्ञान युक्त भाषिक  प्रयोगशाळा उभी राहिली पाहिजे. त्यासाठी सर्व प्रकारचे अनुदान शासन ,प्रशासन पातळीवर दिले पाहिजे . मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला  हा भाग राजकीय ,सांस्कृतिक असू शकतो पण मराठी भाषिक  विद्यार्थ्यांना अजूनही हिम्मत देण्याचे व आवश्यक  पर्यावरण करून देण्याची आवश्यकता आहे. आपण कोणत्याही वेळी सकारात्मक असायला हवे अशी अपेक्षा सर्वांच्या असतात. पण ज्या विद्यार्थ्याला आपला अभ्यासक्रम, आपले पर्यावरण यातून जीवन चांगले जगण्याची आशा उभी राहिलीच पाहिजे.ब्भाषेकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची धरसोड मानसिकता त्या विद्यार्थ्याच्या विकासासाठी हितकारी नाही.

      त्यामुळे  जगभरातील भाषा विषयांचे विद्यार्थी यांनी कर्मवीर अण्णांची जीवनातील धडपड ,संघर्ष पाहून प्रेरणा घ्यायला हवी. आपला उदर निर्वाह चांगला चालावा  यासाठी त्यांनी संस्कृत भाषेची शिकवणी स्वतः लावली होती आणि त्यासाठी ते सकाळी पहाटे उठून संस्कृत शिक्षक याचकडे शिकण्यास जात असत. व नंतर मुलांना संस्कृत शिकवून पैसे मिळवत . अमराठी अधिकारी व्यक्तींना मराठी भाषा शिकवणारे कर्मवीर ही कष्ट कसे घ्यावेत,अभ्यास कसा करावा याची प्रेरणा आहे. त्यामुळे भाषा मंडळाचे मार्गदर्शनाने हीच जाणीव ठेवून येणाऱ्या काळात कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे भाषा मंडळाची उद्दिष्टे आपण पूर्ण करूयात.कर्मवीरांच्या करुणेने शिक्षक,विद्यार्थी ,समाज यांनी मनापासून रचनात्मक कार्यात योगदान देण्याची गरज आहे. विविध साहित्यिक संस्थांनी विद्यापीठाच्या कार्यक्रमात सहभाग द्यावा. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरू  प्रा.डॉ.डी.टी.शिर्के,तत्कालीन भाषा मंडळ प्रभारी  संचालिका प्रा.डॉ.सविता मेनकुदळे व कार्यकारिणी यांनी भाषा मंडळाला योग्य दिशा दाखवली आहे. 
      आज कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रा.डॉ.ज्ञानदेव म्हस्के,मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे; प्रा.[डॉ.]प्रभाकर बचाराम देसाई,मराठी विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले,पुणे विद्यापीठ,पुणे; प्रा.[डॉ.]काशिनाथ बरहाटे,मराठी विभाग प्रमुख,स्व.छगनलाल मुलजीभाई कढी कला महाविद्यालय अचलपूर कॅम्प; प्रा. [डॉ].कैलास अंभुरे मराठी विभाग,डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,संभाजीनगर;  प्रा.डॉ.कृष्णा इंगोले, मराठी भाषा अभ्यास केंद्र ,सांगोला; प्रा.डॉ.प्रमोद मुनघाटे ,मराठी विभाग प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर,व प्रा.[डॉ.]नंदकुमार मोरे,मराठी विभागप्रमुख,शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, व प्र.कुलसचिव प्रा.डॉ.विजय कुंभार यांच्या यांचे मार्गदर्शनाने येणाऱ्या काळात  विविध उपक्रमाद्वारे या विद्यापीठात भाषिक विकासाला गती येईल असा विश्वास  वाटत आहे.

 प्रा.डॉ.सुभाष वाघमारे 
 प्रभारी संचालक ,भाषा मंडळ 
 कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ,सातारा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!