श्री खंडोबा यात्रेनिमित्त आयोजित व्हाॅलीबाॅल स्पर्धेला मलवडीत उत्स्फूर्त प्रतिसाद
सातारा जिल्ह्यातील मलवडी (ता.माण) येथे श्री खंडोबा यात्रेनिमित्त व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्वच संघानी उत्तम कामगिरी दाखवली. जय भवानी स्पोर्ट्स क्लब पिंगळी बुद्रुक संघ व देगाव व्हाॅलीबाॅल क्लब (देगाव) यांच्यातील सामना तीन सेटपर्यंत रंगला.अशा अतिशय अटीतटीच्या सामन्यात जय भवानी स्पोर्ट्स क्लब पिंगळी बुद्रुक संघाने देगाव व्हाॅलीबाॅल क्लब (देगाव) संघाला पराभूत करुन भव्य खुल्या पासिंग व्हाॅलीबाॅल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.या स्पर्धेत सोळा संघांनी सहभाग घेतला होता. सर्वच संघ अत्यंत उत्स्फूर्तपणे स्पर्धेत उतरले होते.अंतिम सामन्यात पिंगळी बुद्रुक संघाने देगाव संघावर २५/२०, २२/२५, १५/०७ अशी मात केली.
विजेत्या पिंगळी बुद्रुक संघास पंधरा हजार रुपये तर उपविजेत्या देगाव संघास दहा हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. तृतीय क्रमांक जयंत स्पोर्ट्स साखराळे संघाने पटकावला. त्यांना पाच हजार रुपये पारितोषिक देण्यात आले. पंच म्हणून निहाल सर खटाव, तेजस माने वडूज, ओम पिसे, मयूर वसव व उदय पिसाळ यांनी काम पाहिले. रविंद्र कदम यांनी उत्कृष्ट समालोचन केले.हेमंत कदम व्हाॅलीबाॅल क्लब, मलवडी आयोजित या स्पर्धेला मलवडी व सत्रेवाडी ग्रामस्थ तसेच त्रिंबकराव काळे विद्यालय, मलवडी तसेच देवा घाडगे, संतोष बोराटे, बापुराव पवार, शुभम बोराटे आदींचे सहकार्य लाभले.
