महत्त्वाच्या बातम्या

गणेश कुंकुले ठरला चांदीच्या गदेचा व एक लाखाचा मानकरी

       श्री खंडोबा यात्रेनिमित्त सातारा जिल्ह्यातील  मलवडी (ता. माण) येथे शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी आयोजित कुस्ती मैदान अतिशय रंगतदार झाले.अंतिम तुल्यबळ काटा लढतीत कोल्हापूरच्या शाहुपुरी आखाड्यात सराव करणारा पिंपरीचा (ता. माण) तुफानी मल्ल गणेश कुंकुले याने अकलूजच्या शिवनेरी तालीमचा मल्ल संतोष जगताप याला नवधर काढून पोकळ घिस्सा डावावर चितपट केले. गणेश कुंकुले एक लाख रुपये व चांदीच्या गदेचा मानकरी ठरला.

      येथील श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्टच्या मालकीच्या राजवाडा मैदानातील आखाड्यात या भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या मैदानात झालेल्या निकाली कुस्त्यांना कुस्ती शौकिनांचा मोठा प्रतिसाद लाभला. राघू ठोंबरे याने बंटी खान याला घुटना डावावर आसमान दाखवत एक लाखाचे इनाम जिंकले. धुळदेव पांढरे याने सौरभ केकान विरुध्दची कुस्ती गुणांवर जिंकली. अभिजीत पवार याने विजय दोलताडे याला अतिशय धोकादायक अशा बॅक सालतो या डावावर पराभूत केले. ओम निमगिरी याने चैतन्य टिकोळे याला गुणांवर मात दिली. राहुल कोकरे याने शुभम मांडवे याला पराभूत केले. अक्षय दिडवाघ विरुध्द श्रीकांत दंडे ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.

        या मैदानात हजारो रुपये इनामांच्या अनेक चटकदार कुस्त्या झाल्या. विशेष म्हणजे अपवाद वगळता सर्वच कुस्त्या निकाली करण्यात आल्या. हे मैदान यशस्वी करण्यासाठी दिपक कुंभार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कष्ट घेतले.
       हे मैदान यशस्वी करण्यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक शेखर गोरे, श्री मल्हारी म्हाळसाकांत देवस्थान ट्रस्ट, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, परकंदीचे माजी सरपंच बाळासाहेब कदम, उद्योजक दशरथ बोराटे, उद्योजक रविराज घाडगे, मलवडीचे माजी सरपंच दादासाहेब जगदाळे, संजय मगर, रामचंद्र जगदाळे, , विजय मदने, भूषण सुर्यवंशी यांनी आर्थिक मदत केली. कै. लालासाहेब जगदाळे यांच्या स्मरणार्थ किरण जगदाळे यांच्याकडून चांदीची गदा तर मैत्री फाऊंडेशन मलवडी यांच्याकडून चषक देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!