बोपदेव घाटात तरुणीचे अपहरण करून केला…
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी (03 ऑक्टोबर) घडली होती.
या प्रकरणाला 24 तास पूर्ण होण्याआधीच आता पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीचे अपहरण करून तिच्यावर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास 21 वर्षीय पिडीत तरुणी तिच्या मित्रासह पुण्याजवळील बोपदेव घाटात फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी तिघे जण त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आपली ओळख मानवाधिकार संघटनेचे कार्यकर्ते अशी करून दिली. यानंतर तिन्ही आरोपींनी पीडित तरुणी व तिच्या मित्राचे फोटो काढले आणि त्यानंतर संबंधित तरूणीला कारमधे बसवून तिचे अपहरण केले. आरोपींनी कार येवलेवाडी भागातील एका गल्लीत नेली आणि तिथे तरुणीवर बलात्कार केला. यानंतर आरोपींनी पीडित तरुणीला खडी मशीन चौकात सोडले आणि ते फरार झाले.
पीडित तरुणीच्या अंगावर ठिकठिकाणी जखमा असून तिला उपचारासाठी ससून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच कोंढवा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी तपास करत या प्रकरणी राजेखां करीम पठाण याच्यांसह तिघांना अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे महिलांच्या सुरक्षेतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. पोलिसांनी ठोस उपोययोजना करावी आणि अशा गुन्ह्यातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करावी, अशी मागणी नागरिकांकडून होताना दिसत आहे.
दरम्यान, पुण्यातील वानवडी भागात स्कुल बस ड्रायव्हरने आठ वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना गुरुवारी समोर आली. याप्रकरणी 45 वर्षांच्या स्कुल बस ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे. 30 सप्टेंबरला आरोपी स्कुल बस ड्रायवरने विद्यार्थ्यांना शाळेत सोडले. यानंतर शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना घरी सोडत असताना त्याने आठ वर्षांच्या दोन मुलींना ड्रायव्हर केबीनमधे बोलावले आणि तिथे त्यांच्यासोबत लैंगिक चाळे केले. एका पिडीत मुलीने पालकांना याबाबत माहिती दिल्यावर ड्रायव्हरला अटक करण्यात आली. तर दुसरी घटना बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी आहे. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या घटनेचा उलगडा शाळेतील गुड टच बॅट टच उपक्रमातून उघडकीस आल्यानंतर नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
