महत्त्वाच्या बातम्या

परभणी प्रकरणाच्या निषेधार्थ जावलीत रिपाईचा निषेध मोर्चा

     परभणी येथे झालेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना प्रकरणी दोषी असणाऱ्या सोपान पवार व त्याच्या साथीदारांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा यासाठी मेढा चौक येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ ) पक्षाच्या वतीने निदर्शने व आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर जावली तालुका नायब तहसीलदार मुनाळे साहेब यांना निवेदन देण्यात आले.
       परभणीतील संविधानाच्या विटंबनेच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या भीमसैनिकांच्यावर पोलीस प्रशासनाने खोटे आरोप  दाखल करून अनेकांना पोलीस कस्टडीत टाकले आहे त्यापैकी सोमनाथ सूर्यवंशी या तरुण विध्यार्थाचा पोलिसांनी जबर मारहाण केल्यामुळे कोठडीतच मृत्यू झालेला आहे. न्यायालयीन कोठडीत मृत्यू होणे ही गंभीर बाब असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनां तात्काळ निलंबित करून चौकशी करावी व कोंबिग ऑपरेशन थांबवावे अशी मागणी रिपाईचे जावली तालुका अध्यक्ष एकनाथ रोकडे व भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालुका अध्यक्ष संतोष खरात यांनी केली.
       भारतीय संविधान हे सर्व हजारो जाती धर्मातील लोकांसाठी अस्मितेचा विषय असून वास्तविक पाहता संविधान अवमान प्रकरणी सर्वांनीच पुढे आले पाहिजे परंतु बौद्ध समाज सोडला तर भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा फायदा घेणारा समाज मात्र संविधानाच्या सन्मानार्थ रस्त्यावर उतरत नाही याची खंत एकनाथ रोकडे यांनी प्रशासनापुढे व्यक्त केली. १ जानेवारीला भीमा कोरेगाव येथेही प्रचंड मोठया प्रमाणात भीमसैनिक जात असतात तेथेही दंगल होण्याची शक्यता असून तिथेही पोलीस प्रशासनाने सुरक्षा वाढवावी अशी मागणी समाज बांधवांकडून होत आहे.
         या प्रसंगी भारतीय बौद्ध महासभेचे जावली तालुका अध्यक्ष संतोष खरात,दशरथ कांबळे, डॉ संपत कांबळे,संगीता परिहार, रेश्मा ताई खरात, प्रवीण कांबळे,मोहन कांबळे, संजय खरात, संतोष चव्हाण, डॉ मिलिंद गायकवाड, नितीन जाधव इत्यादी शेकडो भीमसैनिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!