पुणे नवरात्रौ महोत्सवात ‘महर्षी’ पुरस्कार
समाजात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तीस पुणे नवरात्रौ महोत्सवात दिल्या जाणाऱ्या ‘महर्षी’ पुरस्काराने यंदा कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व महाराष्ट्र विधानसभा कॉंग्रेस पक्ष गटनेते आमदार बाळासाहेब थोरात यांना गौरवले जाणार आहे. हा कार्यक्रम पुणे नवरात्रौ महोत्सवात शनिवार दि. ५ ऑक्टोबर रोजी सायं ६.०० वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे संपन्न होईल. माजी आमदार व ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार असून ज्येष्ठ वात्रटीकाकार व कवी रामदास फुटाणे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवतील. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी आणि सिनेअभिनेते सुनील बर्वे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. देवीच्या मूर्तीचे सन्मान चिन्ह, मानपत्र, पुणेरी पगडी, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
यापूर्वी भारतरत्न पं भीमसेन जोशी, सुशीलकुमार शिंदे, पं हृदयनाथ मंगेशकर, डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. मोहन धारिया, डॉ. विजय भटकर, पं. किशोरी अमोणकर, बिशप डाबरे, नृत्यगुरू शमा भाटे, वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी, शोभना रानडे अशा अनेकांना या पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे, असे आबा बागुल यांनी सांगितले.
