सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पै खाशाबा जाधव जयंती व क्रीडा दिन साजरा
राज्य क्रीडा दिन हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न ठेवता त्याचे रुपांतर क्रीडा संस्कृतीत होणे गरजेचे आहे. यासाठी विभागातील विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन प्र-कुलगुरू प्रा. डॉ.पराग काळकर यांनी विद्यार्थ्यांना राज्य क्रीडा दिनानिमित्त संबोधित करताना केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पै. खाशाबा जाधव यांचा जयंती दिन व दुसरा राज्य क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पराग काळकर, अधिसभा सदस्य श्री. गणपत नांगरे, क्रीडा व शारीरिक शिक्षण शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विष्णु पेठकर व क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाचे प्रभारी क्रीडा संचालक डॉ. सुदाम शेळके यांनी विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पै. खाशाबा जाधव यांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महाराष्ट्र शासनाने ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव यांचा जन्मदिन दि. १५ जानेवारी हा राज्य क्रीडा दिन म्हणून जाहीर केला आहे. त्या निमित्ताने विद्यापीठात पै. खाशाबा जाधव यांचा जयंतीनिमित्त व राज्य क्रीडा दिनानिमित्त यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. विष्णु पेठकर यांनी “CROSS X” या स्पर्धेची घोषणा केली व पुढील १५ दिवस विद्यापीठ आवारातील विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढता कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. विभागातील विद्यार्थी श्री. मोहित यांनी उपस्थितांना पै. खाशाबा जाधव यांच्या विषयीची माहिती सांगितली. तसेच यानिमित्त क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभागाने सकाळच्या सत्रात विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी फुटबॉल, क्रिकेट, व्हॉलीबॉल, रस्सीखेंच या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी क्रीडा व शारीरिक शिक्षणशास्त्र विभाग व क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळातील शिक्षक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
