पुण्यात पावणे दोन कोटींचे सोने लंपास
सराफ व्यवसायिकांनी दागिने घडवण्यासाठी कारागीरांना दिलेले सुमारे पावणे दोन कोटींचे शुद्ध सोने लंपास करून कारागीर पसार झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणात फारसखाना पोलिसांकडून पश्चिम बंगलमधील 5 कारागीरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीव शेख, राहुल,शमिम, सनी शेख , आणि मोहम्मद मिथुन शेख उर्फ अँटीक अशी आरोपींची नावे आहेत.हे एकमेकांचे नातेवाईक असून सर्वजण मूळचे पश्चिम बंगालचे रहिवासी आहेत.जमीर इब्राहिम शेख यांची पुण्यातील गणेश पेठेत झेड ज्वेलर्स अँड इंटरप्रायझेस पेढी आहे.जमीर हे सोन्याचे दागिने घडवण्याचा व्यवसाय करतात. आमीन हा त्यांच्या पेढीचा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. सराफ व्यवसायिक हे शेख यांच्या पेढीत दागिने घडवण्यासाठी शुद्ध सोने देतात. ते सोने तिजोरीत ठेवले जाते. शेख यांच्या पेढीत मोहम्मद शेख हा दागिने घडवून देण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून करत होता. जमीर शेख यांचा त्याच्यावर विश्वास होता. मोहम्मद , आमीन आणि स्वतः जमीर यांच्याकडे तिजोरीच्या चाव्या होत्या.परंतु तिजोरीतील 4 हजार 500 ग्रॅम चे सोने चोरून मोहम्मद व त्यांचे नातेवाईक पसार झाले. शनिवारी तिजोरीतील सोने चोरीला गेल्याचे लक्षात आले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे, गुन्हे शाखेचे निरीक्षक अजित जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे हे तपास करत असून पसार झालेल्या आरोपींचा शोध सुरू आहे.
