प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी;खराब झालेले राष्ट्रध्वज जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्त करण्याचे आदेश
राष्ट्राचे प्रतिक असलेल्या राष्ट्रध्वजचा मान राखणे सर्वांचे कर्तव्य आहे. सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रमांच्या दिवशी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी आहे. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झाल्या नंतर राष्ट्रध्वज पायदळी तुडवला जाऊ नये, इतरत्र फेकला जाऊ नये, त्याचा आवमान होऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी. 26 जानेवारी रोजी प्लास्टिकचा राष्ट्रध्वज वापरण्यास बंदी घालण्यात आली असून इतरत्र पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तहसील किंवा जिल्हास्तरीय समित्यांकडे सुपूर्त करावेत असे आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वज संहिता 2002 व राष्ट्रीय अवमान कायदा 1971 मध्ये तरतूद केली आहे. त्याचप्रमाणे गृह विभागाने 1 जानेवारी 2015 रोजी या बाबत परिपत्रक जाहीर केले आहे. तरीही सांस्कृतिक व राष्ट्रीय कार्यक्रमांच्या वेळी नागरिक, विद्यार्थी प्लास्टिकचा व कागदाचा राष्ट्रध्वज वापरताना दिसतात. अनेकवेळा ध्वज पायदळी तुडवण्यात येतो, इतरत्र फेकला जातो त्यामुळे राष्ट्रध्वजचा अवमान होतो. त्यामुळे रस्त्यात पडलेले , माती लागलेले, फाटलेले राष्ट्रध्वज जिल्हास्तरीय , तालुका स्तरीय समित्यांकडे सुपूर्त करण्याचे अधिकार अशासकीय संस्था, एनजीओ, तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत. या संघटनांनी गोळा झालेले राष्ट्रध्वज जिल्हास्तरीय समित्यांकडे किंवा तालुका स्तरीय समित्यांकडे सुपूर्त करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहेत.
