ग्रामसभांच्या माध्यमातून सायबर सुरक्षिततेचा जागर: ग्रामीण भागात डिजिटल सुरक्षेची नवी संकल्पना
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम सातत्याने राबविले जातात. यंदा २६ जानेवारीच्या निमित्ताने आयोजित ग्रामसभांमध्ये एक अनोखी संकल्पना राबविण्यात येणार आहे. वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांचे तज्ज्ञ प्रतिनिधी ग्रामसभांमध्ये उपस्थित राहून ‘सायबर सिक्युरिटी’ या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विजयसिंह नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमामध्ये एमकेसीएलच्या तज्ज्ञांकडून ग्रामस्थांना सायबर सुरक्षिततेचे महत्त्व, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, फसवणूक टाळण्यासाठी आवश्यक सुरक्षा उपाय आणि डिजिटल साक्षरता यावर सखोल मार्गदर्शन केले जाईल.
यामध्ये एमकेसीएलचे पुणे विभागीय समन्वयक श्री. विश्वजित उत्तरवार आणि त्यांची टीम हे पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व एमकेसीएलच्या केंद्रांशी समन्वय साधणार आहेत. तसेच, सायबर सिक्युरिटीसाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी प्रतिनिधी ग्रामसभेसाठी उपलब्ध करून देणार आहेत. आजच्या डिजिटल युगात इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यासोबतच सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांना डिजिटल व्यवहार आणि सायबर सुरक्षेची पुरेशी माहिती नसल्यामुळे ते सहजपणे फसवणुकीला बळी पडतात. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या पुढाकाराने आणि एमकेसीएलच्या सहकार्याने हा महत्त्वाचा उपक्रम राबविण्यात येत आहे.
२६ जानेवारी रोजी गावोगावी होणाऱ्या ग्रामसभांमध्ये एमकेसीएलचे तज्ज्ञ १५ ते २० मिनिटे उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक करणार आहेत. या सत्रांमध्ये खालील महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन केले जाईल:
सायबर गुन्हे आणि त्याचे प्रकार
सोशल मीडिया आणि डिजिटल व्यवहार करताना घ्यायची काळजी
बँकिंग आणि ऑनलाइन व्यवहारांसाठी सुरक्षितता उपाय
फिशिंग, हॅकिंग आणि फसवणुकीपासून बचाव कसा करावा?
सायबर सुरक्षेसाठी शासनाचे विविध उपाय आणि हेल्पलाईन क्रमांक
महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) हे राज्यातील नामांकित संस्था असून माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. एमकेसीएलच्या तज्ज्ञांचा या क्षेत्रातील दीर्घ अनुभव आता ग्रामीण भागातील नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. या माध्यमातून गावातील नागरिक डिजिटल साक्षर होऊन सुरक्षित डिजिटल व्यवहार करू शकतील.
हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या मदतीने गावपातळीवर राबविण्यात येणार असून यासाठी प्रत्येक गावातील स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी यांची मोलाची भूमिका राहणार आहे. ग्रामसभांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. हा उपक्रम केवळ २६ जानेवारीपुरता मर्यादित न राहता, भविष्यातही असे उपक्रम राबवून नागरिकांना सायबर सुरक्षेच्या दृष्टीने सजग करणे हे जिल्हा परिषदेचे व एमकेसीएलचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व डिजिटल सुरक्षिततेच्या दिशेने पुढे जाण्यासाठी सज्ज व्हावे! असे सर्वांना आवाहन करण्यात येत आहे.
