महत्त्वाच्या बातम्या

जलजीवनची सर्व कामे मार्गी लावणार —  मंत्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले

      जावली तालुक्यातील जलजीवन योजनेअंतर्गत असणारी सर्व कामे लवकरात लवकर मार्गी लावणार यासाठी वेळप्रसंगी जिल्हा नियोजन मंडळातून निधी द्यावा लागला तरी तो देणार अशी ग्वाही महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मेढा येथे झालेल्या विविध विकासvकामांच्या आढावा बैठकी दरम्यान दिली आहे. तसेच महू धरणासाठी वहागाव ग्रामस्थांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील मंत्री. भोसले यांनी यावेळी केले. यावेळी या आढावा बैठकीसाठी महसुल, पाणीपुरवठा, पंचायत समिती, महावितरण, वनविभाग, बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन आदी. विभागांचे अधिकारी तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

     जावली तालुक्यातील विविध विकासकामांचा तसेच शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी मेढ्यात सोमवारी तालुकास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन सार्वजनिक बांधकाम मंत्री  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आले होते. यावेळी या बैठकीसाठी तालुक्यातील विविध खांत्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच आपल्या समस्या मांडण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात यावेळी गर्दी केली होती.  या बैठकीत प्रथम जलजीवन योजनेचा आढावा घेण्यात आला. यावेळी तालुक्यातील विविध गावच्या सरपंचांनी आपल्या समस्या मांडताना या योजनेतुन एक काम झाले तर दुसरे काम होत नाही. त्यामुळे या योजना पूर्ण होत नाहीत. परिणामी गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटत नाहीत अशा समस्या मांडल्या. यावेळी जावली तालुक्यातील १२८ गावांच्या जलजीवन योजनांच्या मंजूरीपैकी १२६ योजनांचे काम सुरू असल्याबाबतची माहिती तसेच सुधारीत ९२ योजनांसाठी प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती जलजीनवच्या अधिकाऱ्यांनी दिली. यावर गरज असलेल्या गावांच्या योजनांचा फेर सर्व्हे करावा व तशी अंदाजपत्रके तात्काळ बनवावीत व हे प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावेत अशा सूचना मंत्री. भोसले यांनी यावेळी केल्या. यावेळी बोंडारवाडी धरणाबाबत नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला असता ट्रायल पिट सुरू करण्याच्या सुचना शिवेंद्रसिंहराजे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच तेथील पूनर्वसन इतर प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तसेच सोळशी धरण होणार आहे त्यावेळी त्यातील पाणीसाठ्याचा लाभ माण खटाव आधी स्थानिकांची पिण्यासाठी व शेतीसाठी द्यावा अशा सूचनाही त्यांनी यावेळी सिंचन विभागाला केल्या. 
तालुक्यातील काही ठिकाणी वनविभाग रस्ते अडवत असून एक्सिस्टिंग रस्ते सुद्धा वनविभाग का अडवीत आहे. असा प्रश्न शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच वनविभागाकडून नागरिकांना नाहक त्रास दिला जात असून वनरक्षक लोकांना अडवून मुजोरपणा करत आहेत. वनक्षेत्रात जनावरे चरायला नेल्यावर दोन हजारांची पावती करा असे वनविभागाकडून सांगण्यात येत आहे. असे संबंधिताला निलंबित करा असे मंत्री. भोसले यांनी सांगितले आहे. 

 

नागरिकांच्या मागण्या
●बोंडारवाडी धरण व्हावे.
●महू धरणाचे काम पूर्णत्वास जावे.
●मेढा आगारास नवीन एसटीबसेस मिळाव्यात.
●मेढ्यात महिलांसाठी स्वच्छतागृहांची बांधणी करावी.
●मेढ्यात नानानानी पार्क उभारावा.
●सरपंच भवन व्हावे.
 
●आनेवाडी टोल नाक्यावर दोन्ही बाजूला शौचालयाची व्यवस्था व्हावी. 
● आनेवाडी ते रायगाव मार्गावर विद्युत दिव्यांची सोय व्हावी. 

यावेळी या आढावा बैठकीसाठी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख,तहसीलदार हणमंत कोळेकर, गटविकास अधिकारी नीलेश पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील,तसेच विविध खात्यांचे सर्व प्रमुख अधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, वसंतराव मानकूमरे, जयदीप शिंदे, सागर धनावडे यांच्यासह तालुक्यातील सरपंच, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

फोटो -आढावा बैठकीदरम्यान बोलताना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले समवेत इतर मान्यवर….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!