शिक्षकांचे प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार :- डॉ नीलेश पाटील
सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेत शिक्षकांनी उठवदार काम केल्याने तालुका शिष्यवृत्ती विभागात तालुका नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ज्या सेवानिवृत्त शिक्षकांनी शिष्यवृत्तीमध्ये चांगले काम केले आहे त्यांच्या सहकार्याने व तालुक्यातील शिक्षकांच्या मदतीने एकत्र येऊन गुणवत्ता विकास मंच ची स्थापना करणार असून सेवानिवृत्त शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू,अशी ग्वाही जावळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांनी दिली.
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव तथा सातारा जिल्हा अध्यक्ष संजय परदेशी आणि सातारा जिल्हा सरचिटणीस अर्जुन दुंदळे यांनी नुकतीच पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकारी डॉ. पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. त्यावेळी पदाधिकारी यांच्याशी संवाद साधताना डॉ. पाटील बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेचे जावली तालुका अध्यक्ष डी टी धनावडे, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, ज्येष्ठ नेते जयंत गाडवे, कार्याध्यक्ष सर्जेराव धनावडे, प्रभाकर धनावडे, विजय भंडारे, अंकुश शिंदे, अरविंद दळवी आदींची उपस्थिती होती. यावेळी डी. टी. धनावडे यांच्या हस्ते गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांचा श्रीफळ देवून स्वागत आणि सत्कार करण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे यांचा ही सत्कार करण्यात आला. शिक्षण विभागाचे कुलकर्णी , धोंडे तसेच अर्थ विभागाचे साठे यांचाही सत्कार करण्यात आला .
संजय परदेशी यांनी संघटनेचा हेतू सांगितला. सेवानिवृत्त बंधू भगिनी यांना कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी, पेन्शन दरमहा च्या एक तारखेला व्हावी, गेले एक वर्ष पूर्ण झाले मागील फेब्रुवारी पासून सेवानिवृत्त झालेल्या बांधवांना अद्याप फंड, आणि अंश राशिकरण इत्यादी रकमा मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात अशा मागण्या करण्यात आल्या.पंचायत समिती मार्फत घेण्यात येणाऱ्या पेन्शन अदालती ची पूर्व सूचना संघटनेला मिळावी यासाठी अध्यक्षांनी पत्र दिले. गटविकास अधिकारी पाटील यांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.अरविंद दळवी यांनी आभार मानले.
