अडीच कोटींचे आमिष दाखवून पुण्यातील व्यवसायिकाची फसवणूक
पुणे: पुण्यातील वानवडी परिसरातील एका व्यवसायिकाची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. शिवतारा प्रॉपर्टीजमध्ये दीड कोटी रुपये गुंतवल्यास सहा महिन्यात अडीच कोटी रुपये परत करू पैसे परत केले नाही तर 2 बीएचके चे चार फ्लॅट देऊ असे आमिष दाखवण्यात आले होते. याबाबत समीर सलीम कुरेशी (वय 45) रा. क्लोअर सिडाटेल सोसायटी साळुंखे विहार रोड (वानवडी) यांनी शिवतारा प्रॉपर्टी च्या संचालकावर वानवडी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर कुरेशी यांचा सेलिब्रिटी मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शिवतारा प्रॉपर्टीचे संचालक निलेश सिंग हे इव्हेंट मॅनेजमेंटची स्पॉन्सरशिप देत असल्याचे समजल्याने त्यांची ओळख झाली होती. त्यांनी शिवतारा प्रॉपर्टीज कन्स्ट्रक्शन कंपनीमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो असे सांगून कंपनीत दीड कोटी रुपये गुंतवले तर सहा महिन्यानंतर अडीच कोटी रुपये परतावा देईल तसेच पैसे दिले नाहीत तर तुम्हाला केशवनगर येथील त्याच्या तारा डिओने या बांधकाम साइट मधील 2 bhk चे 4 फ्लॅट रजिस्टर करून देऊ असे सांगितले होते. या बोलण्याला बळी पडून फिर्यादीने दोन कोटी रुपये गुंतवले त्यानंतर त्यांना 25 लाख रुपये सुरुवातीला परतावा देखील निलेश सिंग यांनी दिला होता. त्यानंतर काही फ्लॅट ग्राहकांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार केल्याने ते अडचणीत आल्याचे सांगितले व त्यावेळी अडचणींचा बहाणा करून निलेश सिंग यांनी रोख साठ लाख रुपये मागितले व त्या बदल्यात ७० लाख रुपये परत देण्याचे आश्वासन देखील दिले होते. त्यांनी 54 लाख रुपये इतरांकडून घेऊन दिले त्यानंतर निलेश सिंह यांनी पुन्हा परतावा म्हणून 18 लाख 50 हजार रुपये दिले होते. समीर कुरेशी यांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याची मागणी केल्यावर त्यांनी एक कोटी 25 लाख रुपयांचे देश दिले परंतु सध्या खात्यात पैसे नसल्याने चेक भरू नका असे सांगितले. त्याच्यावरून त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला.
हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादी व निलेश सिंग यांची कॉमन मित्रांसह 12 फेब्रुवारी 2020 रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये निलेश सिंह यांनी केशवनगर येथील त्याच्या तारा डिओने या बांधकाम साईट मधील चार फ्लॅट देण्याचे कबूल केले होते. त्यानंतरही त्यांनी फ्लॅट दिलेले नाहीत. एकूण परतव्यावर 7 फ्लॅट देण्याचे आश्वासन त्यांनी दिलेले परंतु फ्लॅट न दिल्याने शेवटी समीर कुरेशी यांनी त्याच्या विरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने या घटनेचा तपास करत आहेत. याबाबत शिवतारा प्रॉपर्टीजचे संचालक निलेश शिवाजी सिंग व त्यांची पत्नी मीनाक्षी निलेश सिंग (रा. फरेस्ट कॅसल सोसायटी मुंडवा पूर्व वानवडी) यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ठेविदार अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
