महत्त्वाच्या बातम्या

अन्नसुरक्षेसाठी कृषी संशोधनाला गती द्या; राहुल नार्वेकरांचे आवाहन

कर्जत : देशाची अर्थव्यवस्था आजही मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्रावर आधारित असून, देशाची अन्नसुरक्षा कायम राखण्यासाठी शेती आणि शेतकरी अधिक सक्षम करणे अत्यंत आवश्यक आहे. कृषी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि अनुभवाधारित शिक्षकांच्या माध्यमातून नव्या पिढीला शेतीशी जोडणे ही काळाची गरज आहे. याच उद्देशापोटी राज्यातील शहरी भागातील प्रत्येक शाळेने वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे, असे आवाहन महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले आहे.

    डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत येथे शिक्षण प्रसारक मंडळ (मालाड) संचलित उत्कर्ष मंदिर विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनीं साठी आयोजित ‘शास्त्रज्ञ, शेतकरी व विद्यार्थी संवाद‘ कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

    या उच्चस्तरीय कार्यक्रमास विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. बी. डी. वाघमोडे, मालाडच्या शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक विजय लेले, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे सदस्य विनायक काशीद, विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय तोरणे, तसेच मुंबईच्या स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळाचे कार्याध्यक्ष स्वप्नील सावरकर यांच्यासह अनेक मान्यवर, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक, शिक्षक, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात भारता समोर अन्नसुरक्षेचे अत्यंत मोठे आव्हान उभे ठाकले होतेपरंतु देशातील अन्नदात्या शेतकऱ्यांच्या अथक व अहोरात्र परिश्रमांमुळे आज भारत केवळ अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्णच झाला नाही, तर इतर गरजू देशांनाही अन्नधान्य पुरवणारा देश म्हणून जागतिक पातळीवर आपली नवी ओळख निर्माण केली आहे. हे अभूतपूर्व यश केवळ आणि केवळ आपल्या शेतकऱ्यांच्या कष्टांमुळेच शक्य झाले आहे. त्यामुळे देशाची अन्नसुरक्षा भविष्यातही कायम राखण्यासाठी कृषी क्षेत्राकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

   विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या कृषी अभ्यास सहलीच्या उपक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले की, पुस्तके, संगणक आणि इंटरनेटच्या माध्यमातून सैद्धांतिक ज्ञान मिळत असले, तरी प्रत्यक्ष अनुभवातून मिळणाऱ्या ज्ञानाची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात शेतात जाऊन शेतीची पद्धत, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान जवळून पाहिल्यास त्यांचे ज्ञान अधिक समृद्ध होते. म्हणूनच राज्यातील सर्व शहरी भागातील शाळांनी वर्षातून किमान एकदा विद्यार्थ्यांसाठी कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करावे.

   भारत आज जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला असून, सन २०२७ पर्यंत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत ‘विकसित राष्ट्र‘ बनण्याचे आपले निश्चित उद्दिष्ट आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी देशातील शेतकरी संपन्न, सक्षम आणि समाधानी असणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. कृषी क्षेत्रात सतत विकसित होणारे नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधन शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणे ही काळाची गरज आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

शेतकरी अनेक नैसर्गिक आपत्तींचा धैर्याने सामना करत अतोनात परिश्रमातून देशाला अन्नसुरक्षित ठेवत आहेत. त्यांच्या कल्याणासाठी कृषी संशोधन संस्था आणि कृषी विद्यापीठांचे कार्य अत्यंत मोलाचे आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा देशभरातील शेतकऱ्यांना मोठा लाभ होत असून, विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासा साठी आणि त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, अशी ठाम ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

   या दौऱ्या दरम्यान विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केवळ मार्गदर्शनापुरते मर्यादित न राहता, उत्कर्ष मंदिर विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि उपस्थित शेतकऱ्यां समवेत थेट शेतात उतरून भात लागवडीत प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शेतीविषयी प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण घेण्याचे महत्त्व अत्यंत सोप्या शब्दांत विशद केले. तसेच शेतकऱ्यांसोबत आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीबाबत सखोल चर्चा करताना कृषी क्षेत्रातील संशोधन आणि प्रत्यक्ष शेतातील अनुभव यांची योग्य सांगड घालणे हीच काळाची गरज असल्याचे अधोरेखित केले.

   या दौऱ्यात त्यांनी प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील ‘कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राला‘ भेट देऊन तिथल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. तसेच भात जलद पैदास (स्पीड ब्रीडिंग – Speed Breeding) केंद्राची पाहणी करून आधुनिक संशोधन प्रक्रियेची माहिती जाणून घेतली आणि यांत्रिकी पद्धतीने करण्यात येणाऱ्या भात लागवडीच्या प्रात्यक्षिकालाही भेट दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!