महत्त्वाच्या बातम्या

अभिजीत दिपके यांची भेट महायुतीला भोवणार? संजय शिरसाट अन् बच्चू कडू शिंदेंच्या रडारवर, राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: काकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भेट घेणे शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय शिरसाट आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना चांगलेच महागात पडले असल्याचे समोर येत आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर तब्बल एक महिना उपोषण आणि संसद भवनावर मोर्चा काढणाऱ्या अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी जाऊन काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट आणि बच्चू कडू यांनी भेट घेतली होती. मात्र, महायुतीची कोणतीहि भूमिका किंवा निर्देश नसताना परस्पर ही भेट घेतल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच आक्रमक झाले असून त्यांनी या दोन्ही नेत्यांची कानउघडणी केल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. या घडामोडीनंतर छत्रपती संभाजीनगर येथे जाऊन मंत्री संजय शिरसाट यांनी थेट अभिजीत दिपके यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पाठोपाठ, स्वतः अभिजीत दिपके घरी पोहोचल्यावर आमदार बच्चू कडू यांनीही त्यांची भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, यामुळे महायुतीमधील अंतर्गत सुसंवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. युतीची कोणतीही भूमिका ठरलेली नसताना नेत्यांनी अशा प्रकारे भेट घेणे योग्य नाही, अशी भूमिका घेत एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण भेटीगाठींवर भारतीय जनता पक्षानेही तीव्र आक्षेप घेतला आहे. भाजप नेते आणि विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी यावर प्रतिक्रिया देताना थेट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचे वितुष्ट किंवा गैरसमज निर्माण होईल, असे कृत्य कोणत्याही नेत्याने करू नये, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे केवळ शिंदेंची नाराजीच नव्हे, तर भाजप नेत्यांची प्रतिक्रिया पाहता आगामी काळात महायुतीत मोठा राजकीय वादंग पेटण्याची आणि वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!