महत्त्वाच्या बातम्या

अमित शहांच्या पुणे दौऱ्याआधी राजकीय वातावरण तापले; काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा

पुणे: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आगामी पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दिल्लीतील आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाकडून जोरदार आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून, याला जशास तसे उत्तर देण्याचा पवित्रा भाजपने घेतल्याने दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक पार पडली असून, सुरक्षेचे कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

एकीकडे राजकीय संघर्ष पेटलेला असतानाच, दुसरीकडे केंद्रीय मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पुणे महानगरपालिका प्रशासनही पूर्णपणे सतर्क झाले आहे. गृहमंत्र्यांच्या ‘व्हीआयपी’ ताफ्याला पुण्यात आल्यावर खराब रस्त्यांचे किंवा खड्ड्यांचे दर्शन घडू नये, यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर रस्ते दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. महापालिका आयुक्तांनी विशेष आढावा बैठक घेऊन अमित शहा यांच्या संभाव्य प्रवासाच्या मार्गावरील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते चकाचक करण्याचे कडक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

विमानतळापासून ते महर्षीनगरपर्यंत ज्या मार्गाने अमित शहांचा ताफा जाणार आहे, ते सर्व रस्ते पॅचमुक्त, स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहा हे शुक्रवारी रात्रीच पुणे मुक्कामी येणार असून, शनिवारच्या दिवशी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सारसबाग परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी जाण्याची दाट शक्यता आहे.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वारगेट, सारसबाग आणि व्होल्गा चौक परिसरातील रस्तेही सुस्थितीत करण्याचे काम सुरू आहे. सामान्य पुणेकर नागरिक शहरातील खड्ड्यांमुळे आधीच त्रस्त असताना, व्हीआयपी दौऱ्याच्या निमित्ताने का होईना प्रशासनाला जाग आली असून संबंधित भागांतील रस्त्यांची तातडीने दुरस्ती केली जात आहे. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस व सुरक्षा यंत्रणांनी सर्व बाजूंनी कडेकोट बंदोबस्त राखला आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!