आदर्श’ने घातली माण तालुक्याच्या वैभवात भर
‘आदर्श’ने माण तालुक्याच्या वैभवात भर घातली असून शैक्षणिक क्रांती घडविली आहे. या शाळेने गुणवत्ता तर जपली आहेच पण कलाकौशल्यांना सुध्दा नेहमीच संधी दिली आहे असे प्रतिपादन ग्रामविकास व पंचायतराज कार्य मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.येथील आदर्श प्राथमिक शाळा व श्रीराम बालक मंदीर, माध्यमिक विद्यालय दहिवडी या शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी धाराशीवचे जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओंबासे, दैनिक तरुण भारतचे सातारा आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर, संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. रामकृष्ण जाधव, संस्थेच्या सचिव प्रा. शीला जाधव, सिध्दनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष अरुण गोरे, संजय गांधी, अमृत जाधव, जयप्रकाश जाधव, अॅड. महेश वसव आदी मान्यवर उपस्थित होते.
नामदार जयकुमार गोरे म्हणाले, स्नेहसंमेलन हा वर्षभर विद्यार्थी, शिक्षक यांनी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक करण्याचा क्षण असतो. आपल्या मुलाचे सादरीकरण रंगमंचावर पाहण्यासारखा दुसरा आनंद आईवडीलांसाठी नसतो अन तो पाहण्यासाठी ते आतुर झालेले असतात. खरंतर चांगलं आयुष्य घडविण्यासाठी आवश्यक ते व्यवहार ज्ञान शिकविणारे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी नवीन शिक्षण धोरण राबविण्याची गरज आहे. आदर्श शाळेला सर्वतोपरी मदत करण्यात येईल.
डाॅ. सचिन ओंबासे म्हणाले, मी आदर्श शाळेचा माजी विद्यार्थी आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.स्नेहसंमेलन हे आपल्यातील कलागुण ओळखण्याचे व्यासपीठ आहे. कलागुणांना वा देऊन पुढील व्यावसायिक जीवनात त्यांचा उपयोग करता येतो. माणमधील विद्यार्थ्यांनी विपरीत परिस्थितीवर मात करीत उच्च व व्यावसायिक शिक्षण घेऊन आपली प्रगती साधावी. दिपक प्रभावळकर म्हणाले, आदर्शने सर्वच शाळांसाठी आदर्श घालून दिला असून दहिवडीसारख्या ठिकाणी इतकी छान शाळा असणं ही अभिमानास्पद बाब आहे.आदर्शच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अतिशय बहारदार व मंत्रमुग्ध करणाऱ्या कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली.यावेळी ग्रामविकास व पंचायतराज कार्य मंत्री जयकुमार गोरे यांनी मुख्य रस्त्यापासून आदर्श शाळा तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेपर्यंत येत्या दोन महिन्यात डांबरी रस्ता बनवून देण्याची ग्वाही दिली. मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांचे कौतुक केले गेली बावीस वर्षे मुख्याध्यापक म्हणून धुरा सांभाळत असताना मुख्याध्यापक लालासाहेब दडस यांनी शाळेला उंचीवर नेले आहे. शाळेची सर्वांगीण प्रगती होण्यात लालासाहेब दडस यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षण असो वा समाजकारण वा पत्रकारिता या सर्वच क्षेत्रात लालासाहेब दडस हे मोठा आधार ठरत आहेत अशा शब्दात ग्रामविकास व पंचायतराज कार्य मंत्री जयकुमार गोरे यांनी त्यांचे कौतुक केले.
