महत्त्वाच्या बातम्या

आदिवासी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी मोहीम; ७९ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन चाचणी

मुंबई: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्यामधील रक्तक्षय किंवा ॲनिमियाच्या समस्येचे प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने हाती घेतलेली मोहीम अत्यंत यशस्वी ठरत आहे. विभागा मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘ॲनिमिया निवारण कार्यक्रमांतर्गत’ अवघ्या दीड महिन्यात राज्यातील तब्बल २०३ शासकीय व अनुदानित आश्रम शाळा तसेच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील ७९ हजार ६२४ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे.

       या महत्त्वाकांक्षी आरोग्य मोहिमेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी आदिवासी विकास विभागाने ‘सिटिझन्स असोसिएशन फॉर चाईल्ड राईट्स’ (सीएसीआर) या संस्थेसोबत सामंजस्य करार केला आहे. या माध्यमातून आश्रमशाळांमधील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची कसून तपासणी केली जात आहे. आतापर्यंत तपासणी करण्यात आलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये ३७ हजार ९१९ विद्यार्थी आणि ४१ हजार ७०५ विद्यार्थिनींचा समावेश आहे. यात १४९ शासकीय आश्रमशाळांमधील ५५ हजार ८६८, ४८ अनुदानित आश्रमशाळांमधील २२ हजार ४२० तसेच ६ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधील १ हजार ३३६ विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पडताळणी पूर्ण झाली आहे.

      राज्यभरातील विविध विभागांमध्ये राबवलेल्या या मोहिमेचा आढावा घेतल्यास, नाशिक विभागात १०४ शाळांमधील सर्वाधिक ४१ हजार ४६९ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण झाली असून, यामध्ये ८० शासकीय आश्रमशाळांतील ३१ हजार ३९३, २१ अनुदानित आश्रमशाळांतील ९ हजार २२७ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ८४९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच ठाणे विभागात ८१ शाळांमधील ३३ हजार ४२६ विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे, ज्यामध्ये ५९ शासकीय आश्रमशाळांतील २२ हजार ५४, १९ अनुदानित आश्रमशाळांतील १० हजार ८८५ आणि ३ एकलव्य मॉडेल निवासी शाळांतील ४८७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय, अमरावती विभागात २ हजार ८९८ आणि नागपूर विभागात १ हजार ८३१ विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.

     या व्यापक तपासणी मोहिमे दरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी किंवा प्रमाणापेक्षा घटल्याचे निदर्शनास आले आहे, अशा विद्यार्थ्यांना आवश्यकते नुसार पौष्टिक पूरक आहार आणि योग्य वैद्यकीय उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांचे शारीरिक आरोग्य सुदृढ राहिल्यास त्यांची शैक्षणिक प्रगती देखील उत्तम होईल, या उद्देशाने हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरणार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांचे सुदृढ आरोग्य हेच आमचे सर्वोच्च प्राधान्य असून, ॲनिमिया निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून रक्तक्षयाची समस्या मुळापासून दूर करण्यासाठी अशा व्यापक मोहिमा सातत्याने राबविल्या जातील, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांनी दिली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!