महत्त्वाच्या बातम्या

‘आमच्या नादाला लागू नका’; राजू पाटलांचा भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांना इशारा

कल्याण: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात अलीकडेच करण्यात आलेल्या वक्तव्या वरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजू पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल बोलण्याची त्यांची पात्रता किंवा अधिकार आहे का, असा थेट सवाल उपस्थित करत, जर आमच्या नादी लागलात तर सगळं बाहेर काढू, असा कडक इशारा राजू पाटील यांनी दिला आहे. कल्याण ग्रामीणमधील पक्षाच्या एका कार्यक्रमा दरम्यान त्यांनी भाजप नेत्यांच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला.

       परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून केली जाणारी राजकारणाची प्रवृत्ती चुकीची असल्याचे स्पष्ट करत राजू पाटील म्हणाले की, दुसऱ्या पक्षात असले प्रकार चालत असतील, पण आमच्या पक्षाला याची लागण लागता कामा नये. आपल्या पक्षात जे येतात आणि ज्यांना पक्षाचे ध्येय-धोरण मान्य आहेत, त्या सर्वांचे स्वागतच आहे. जो माणूस येथे राहतो आणि इथलाच होतो, तो आपलाच असतो, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. यावेळी त्यांनी भाजपच्या व्यासपीठावर असणाऱ्या दिना (दिनेश) दुबे यांच्या उदाहरणाचा संदर्भ देत ते आपलेच असल्याचे सांगितले. राजकारणासाठी समाजात किंवा परप्रांतीयां मध्ये फूट पाडण्याचे खेळ आपल्या पक्षात चालत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सुनावले.

      यावेळी दिवा भागातील अनधिकृत रिक्षांचा मुद्दा उपस्थित करत राजू पाटील यांनी भाजप नेत्यांना थेट शब्दांत खडसावले. दिव्यात सध्या किती अनधिकृत रिक्षा सुरू आहेत, याची माहिती विरोधकांना आहे का, असा सवाल करत आमच्या नादाला लागलात तर सगळ्यांचे कारनामे चव्हाट्यावर आणू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच नेहरू मैदान नेमके कोणाला देण्यात आले, ते अधिकृत आहे का आणि सावरकर उद्यानातील कार्यालय कायदेशीर आहे का, अशा अनेक प्रश्नांवरून त्यांनी भाजप नेत्यांना घेरले. पक्षाच्या प्रश्नांना पक्षाच्या पद्धतीनेच उत्तर द्या, पण जर वैयक्तिक बोलाल तर उत्तरही त्याच भाषेत वैयक्तिक दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. हर्षद पाटील हा केवळ एक पदाधिकारी नसून तो माझा भाऊ आहे, असे सांगत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे संकेत दिले.

          या संपूर्ण वादानंतर भाजप नेते रवींद्र चव्हाण यांनाही उद्देशून राजू पाटील यांनी खडे बोल सुनावले. “रवींद्र चव्हाण यांना माझं सांगणं आहे की, हे सगळं आता आवरा,” असे म्हणत त्यांनी सकारात्मक राजकारण करण्याचा सल्ला दिला. तुम्ही सत्तेत आहात आणि तुम्ही जर विकासकामे केली असतील, तर आम्ही जाब तुम्हालाच विचारणार, इतर कोणाला विचारणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. राजू पाटील यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे कल्याण-डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आगामी काळात या वादानंतर सत्ताधारी व मनसे मधील संघर्ष आणखी पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!