महत्त्वाच्या बातम्या

आरोग्यसेवेचा अनोखा उपक्रम; भाऊसाहेब रंगारी ट्रस्टकडून ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप

पुणे: हिंदुस्थानातील पहिल्या सार्वजनिक गणपतीचा मान असलेल्या ऐतिहासिक ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’च्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये धार्मिक अनुष्ठानासोबतच समाजोपयोगी कार्याचा एक अत्यंत स्तुत्य पायंडा पाडण्यात आला आहे. उत्सवाच्या काळात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि गरजूंपर्यंत दर्जेदार वैद्यकीय सुविधा पोहोचवण्यासाठी ट्रस्टतर्फे एका भव्य व सर्वसमावेशक मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य महोत्सवात नेत्र तपासणी, फिजिओथेरपी तसेच दंत उपचारांसंबंधी विशेष तपासण्या केल्या जाणार असून, विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे गरजू व सर्वसामान्य नागरिकांना तब्बल ११ हजार चष्म्यांचे मोफत वाटप केले जाणार आहे.

      शहरातील अनेक नामांकित रुग्णालये आणि अग्रगण्य संस्था या सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवत आहेत. या शिबिरा अंतर्गत विविध आरोग्य संस्थांचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अपोलो हॉस्पिटलच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबर दरम्यान आरोग्य तपासणी मोहीम राबविण्यात आली. त्यानंतर, अग्रवाल आय हॉस्पिटलच्या सहकार्याने १७ ते २० सप्टेंबर या कालावधीत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, डोळ्यांच्या विविध आजारांनी व समस्यांनी त्रस्त असलेल्या नागरिकांची येथे तपासणी होत आहे. याशिवाय, आगामी २१ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध संचेती हॉस्पिटलच्या वतीने फिजिओथेरपी तपासणी केली जाईल. याच दिवशी आणि २२ सप्टेंबरला इंडियन प्रोस्थोडॉन्टिक सोसायटी आणि डॉ. विजय माब्रुकर यांच्या सहकार्याने नागरिकांसाठी दंत तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच, मॉडर्न कॉलेजच्यावतीने २२ सप्टेंबरला तर ढोले पाटील यांच्या सहकार्याने २३ सप्टेंबर रोजी फिजिओथेरपी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे संपूर्ण आरोग्य शिबिर श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या मुख्य मंडपात पार पडत आहे.

       गणेशोत्सव हा केवळ धार्मिक विधींचा किंवा आनंदाचा सण न राहता तो समाजोपयोगी आणि लोककल्याणकारी उपक्रमांचा उत्सव व्हावा, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो, असे मत यावेळी ट्रस्टचे उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी व्यक्त केले. विविध नामांकित रुग्णालये व संस्थांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरामुळे नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, तज्ज्ञांचे मोलाचे मार्गदर्शन आणि आवश्यक उपचाराबाबतचा सल्ला एकाच छताखाली मिळत आहे. बाप्पाच्या असीम आशीर्वादाने हा आरोग्योत्सव पार पडत असून, विशेषतः गरजू नागरिकांना ११ हजार चष्म्यांचे वाटप करण्याचा संकल्प ट्रस्टने पूर्णत्वास नेला आहे. ट्रस्टचे हे जनसेवेचे व सामाजिक आरोग्याचे कार्य यापुढेही अविरत सुरूच राहील, असे स्पष्ट करत पुनीत बालन यांनी जास्तीत जास्त नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!