आषाढी वारी निमित्त लोणंद येथील पालखी तळावरील नियोजनाची जयकुमार गोरेंकडून पाहणी
राज्याचे ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने लोणंद येथील पालखी तळावरील नियोजनाची पाहणी केली.यावेळी आमदार सचिन पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यशणी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, मा. समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, प्रांत कचरे सो, तहसीलदार अजित पाटील, नगराध्यक्ष मधुमती गालींदे ताई हे पालखी तळावर उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस हर्षवर्धन शेळके पाटील यांनी पालखीच्या अनुषंगाने केलेल्या मागण्या
१) लोणंद शहराकरिता जिल्हा नियोजन मंडळातून किंवा अन्य योजनेतून पालखी सोहळ्यासाठी अंदाजे रक्कम रु. २५.०० लक्ष तरतूद करावी, जेणेकरून नगरपंचायत फंड इतर विकास कामासाठी उपयोगी येईल.
२) लोणंद शहरातील अंतर्गत पालखी मार्ग नगरपंचायत कार्यालय ते तानाजी चौक ते भवानी माता मंदिर ते पालखीतळ ते पुणे- सातारा रस्ता हा काँक्रिटीकरण होऊन दोन्ही बाजूस गटर व्हावे.
३) श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतळ ते महादेव मंदिर येथील खेमावती नदीकाठी असणारी उर्वरित संरक्षण भिंत १०० मीटर इतकी बांधण्यात यावी.
४) लोणंद नगरीसाठी असणाऱ्या पाणीपुरवठा जलशुद्धीकरण केंद्रासाठी सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात यावा.
जयकुमार गोरे यांनी लोणंद नगर पंचायतीच्या मुख्याधिकारी गायकवाड यांना वरील कामाचे प्रस्ताव तातडीने शासनास पाठवून द्या असे आदेश देऊन दोन दिवसात मी कामांना मंजुरी देतो असे आश्वासन दिले आहे.
