उल्हासनगर महानगरपालिकेच्या पाणी करवाढीचा युवासेना-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) तर्फे जाहीर विरोध
उल्हासनगर महानगरपालिकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी पाणी करात जाहीर केलेली दर वाढ ही शहरवासीयांवर अन्यायकारक आणि बेजबाबदार निर्णय आहे. युवासेना-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) हा या करवाढीचा जाहीर विरोध केला असुन महानगरपालिकेकडे तातडीने हा निर्णय रद्द करण्याची मागणी करत आहे. उल्हासनगर मधील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्याऐवजी, महानगरपालिका त्यांच्यावर आर्थिक बोजा लादत आहे. झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी ₹३,०००, कायमस्वरूपी घरांसाठी ₹६,५०० आणि बंगल्यांसाठी ₹८,००० अशी कररचना ही गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी असह्य आहे. पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क असून, त्यावर करवाढ करणे हे सामाजिक न्यायाला धक्का आहे.
याबरोबरच, शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अत्यंत सदोष आणि अकार्यक्षम आहे. अनेक भागात अनियमित पाणीपुरवठा, कमी दाब आणि अशुद्ध पाणी यासारख्या समस्या नागरिकांना सतावत आहेत. अशा परिस्थितीत करवाढ करणे हे नागरिकांवर खडतर अन्याय आहे. पाणीपुरवठा विभागाची अकार्यक्षमता आणि उदासीनता ही या समस्येची मूळ कारणे आहेत. करवाढीऐवजी अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.
युवासेना-शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) च्या वतीने पत्राद्वारे आयुक्तांकडे खालील मागण्या स्पष्टपणे मांडण्यात आले आहे :
१) पाणी करवाढीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा.
२) पाणीपुरवठा व्यवस्थेची गुणवत्ता सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जावीत.
३) अकार्यक्षम अधिकाऱ्यांवर खटले भरण्यात येऊन त्यांना निलंबित करण्यात यावे.
४) प्रत्येक भागासाठी पाणीपुरवठ्याची निश्चित वेळ घोषित करून तिची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी.
