एसटी आरक्षणासाठी धनगर समाजाच्यावतीने तहसीलदारांना निवेदन
दहिवडी: धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एस.टी.) प्रवर्गात आरक्षण मिळावे तसेच सध्या जालना येथे आमरण उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी माण तालुक्यातील सकल धनगर समाजानेधरणे आंदोलन करत तहसीलदार विकास अहिर यांना निवेदन दिले.
यावेळी अर्जुनतात्या काळे, अमृत चौगुले, दादासाहेब काळे, मामुशेठ वीरकर, सचिन होनमाने, डॉ. अजित दडस, दादासाहेब गोरड, वैभव महानवर, रघुनाथ भिसे, वसंत सजगणे, प्रशांत गोरड, प्रशांत वीरकर, शरद गोरड, सुरेश गोरड, कैलास दडस, नितीन कटरे, यांच्यासह धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांचा विचार करून समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण द्यावे, अशी एकमुखी मागणी समाजाच्या वतीने करण्यात आली.
मागील अनेक वर्षांपासून धनगर समाज सतत आरक्षणासाठी लढा देत आहे. राज्यभरात शंभरहून अधिक वेळा उपोषणे करूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. त्यामुळे अखेर जालना येथे बोऱ्हाडे यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले असून, या आंदोलनाला माण तालुक्यातील धनगर समाजाने एकवटून ठाम समर्थन दिले आहे. सकल धनगर समाजाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात शासनाने तातडीने धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. समाजबांधवांच्या भावना शासनदरबारी पोहोचवून न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
