कराडात बकरी ईदचे सामुदायिक नमाज पठण; डीवायएसपी अमोल ठाकूर यांच्याकडून ईदगाह मैदानाची पाहणी
कराड शहरात उद्या बकरीद ईद साजरी होणर असून शहरातील शाही ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण होणार आहे. या पार्श्वभूमीवर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी ईदगाह मैदानावर नमाज पठण होणाऱ्या परिसराची पाहणी केली. यावेळी या ठिकाणी होणाऱ्या सामुदायिक नमाज पठणा बद्दलची माहिती शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्टचे ट्रस्टी व सामाजिक कार्यकर्ते साबीर मिया मुल्ला यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांना दिली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार हे उपस्थित होते. श्री ठाकूर यांनी यावेळी संपूर्ण प्रार्थना स्थळाची व परिसराची पाहणी केली.
दरम्यान उद्या शनिवार दिनांक सात जून रोजी ईद-उल-अज़हा (बकरीद ईद) निमित्त चावडी चौक येथील जामा मज्जीद येथून सकाळी साडेसात वाजता झेंडा मिरवणूक निघणार आहे. ही मिरवणूक चावडी चौक, मेन रोड ने आझाद चौक यशवंत हायस्कूल पासून हेड पोस्ट, बापूजी साळुंखे पुतळा ते राज मेडिकल पासून विजय दिवस चौक ते ईदगाह मैदान अशी काढण्यात येणार आहे.
ईदगाह मैदानावर साडे आठ वाजता सामुदायिक नमाज पठण होणार असल्याची माहिती शाही वक्फ कब्रस्तान ईदगाह ट्रस्ट कडून देण्यात आली आहे. कराड शहर परिसर व तालुक्यातून हजारो मुस्लिम बांधव उद्या या सामुदायिक नमाज पठाणात सहभागी होणार आहेत.
