कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा प्रथम दीक्षांत समारंभ संपन्न
‘ आपल्या पूर्वजांना माहीत होते शिक्षणाशिवाय आपल्या प्रदेशाचा विकास होणार नाही म्हणून त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या आज त्याचीच फळे आपण चाखत आहोत. त्यांनी जो वारसा तयार केला तो येणाऱ्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक योगानातून हेच सिद्ध होत आहे.आज हे विद्यापीठ म्हणजे त्यांच्या दूरदृष्टीला वाहिलेली आदरांजली आहे. बहुजन समाजाच्या शिक्षण आणि सामाजिक उत्थानासाठी शिक्षणासाठी त्यांनी दिलेले योगदान अद्वितीय आहे. आपल्या पूर्वजांच्या योगदानाबद्दल आपण कृतज्ञ असायला हवे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल व कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलपती मा.सी.पी.राधाकृष्णन यांनी व्यक्त केले.
ते सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या प्रथम दीक्षांत समारंभ कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. या समारंभास राज्यपालांचे प्रधान सचिव मा.प्रशांत नारनवरे, कुलाधिकारी मा. चंद्रकात दळवी, कुलगुरू मा. डॉ.ज्ञानदेव म्हस्के, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन अॅड.भगीरथ शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ.अनिल पाटील, मा. जिल्हाधिकारी मा.विकास देशमुख, मा.डॉ. माणिकराव साळुंखे ,विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार, डॉ.हेमंत उमाप, रयतचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जे.के.जाधव बापु, सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेंनकुदळे, विद्यापीठ अधिष्ठाता प्रा.डॉ.डी.नामदास, डॉ.अनिलकुमार वावरे, डॉ. महांनवर, प्रा. डो.आर आर.साळुंखे, प्रा.डॉ.सचीन वर्णेकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, प्राचार्य डॉ.बी.टी.जाधव, प्राचार्य डॉ.गणेश जाधव, जिल्हाधिकारी , पोलीस अधीक्षक ,मुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
सातारा आणि परिसर याबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले की .’ सातारा हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक व सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध शहर असून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिसरी राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म जर या भूमीत झाला नसता तर काय झाले असते ? मी सुद्धा, आज मी इथे सी.राधाकृष्णन नावाने उभा आहे पण माझे सुद्धा नाव अजून काहीतरी राहिले असते. या भारत भूमीत अनेक पाकिस्तान तयार झाले असते आक्रमकांच्या विरोधात हे शूर योद्धे लढले. इतिहासात डोकावत असताना आपल्याला या ऐतिहासिक सत्याचे आकलन व्हायला हवे. आपण इस्लामच्या विरोधात आहोत का ? नाही. इस्लाम सर्वत्र आहे.आपल्याला एकत्र मिळून राहायचे आहे. परंतु त्याच वेळी आपल्याला ऐतिहासिक सत्याची जाण असली पाहिजे. आपला प्रवास कसा झाला हे आपल्याला कळले पाहिजे आणि हळूहळू आपण आपल्या प्राचीन वैभवापर्यंत पोहोचत आहोत. सातारा ही राजर्षी छत्रपती शाहू महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील इत्यादी अनेकांची भूमी आहे. १९५२ ला ऑलिम्पिक मध्ये कुस्तीत मेडल मिळवणारया खाशाबा जाधव यांची ही भूमी आहे. या प्रदीर्घ काळानंतर आता आपल्याला मेडल मिळत आहेत. १९५२ मिळविलेले मेडल हे या प्रदेशाचे राष्ट्राला मोठे योगदान आहे. ४ महिन्यापूर्वी मी साताऱ्यात लोकहिताच्या कामासाठी आढावा बैठकीस उपस्थित होतो. त्यामुळे मला सातारा विषयी भरपूर माहिती मिळाली. मुळे माझ्या भावना कृतज्ञतेच्या आहेत. आपण जेंव्हा सामान्य माणसाला भेटतो तेंव्हा त्यांच्याकडून समाज विकासाच्या रचनात्मक ,सकारात्मक अनेक कल्पना मिळतात.
